३७ वर्षांनंतर आडिवरेला महापूर; महाकाली मंदिर परिसरात पाणीच पाणी

वडापेठ आणि रुंढे परिसराला मोठा फटका..

राजन लाड( जैतापूर वार्ताहर ):शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे आडिवरे गावातील ओझर नदीला महापूर आला असून, यामुळे गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारात पाणीच पाणी साचले होते मंदिराच्या पहिल्या पारिपायरीपर्यंत पाणी भरले होते ,संपूर्ण परिसर जलमय झाला होता.

 

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, तब्बल ३७ वर्षांनंतर एवढ्या प्रमाणात महापूर आल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यालगतच्या अनेक घरांमध्ये 6 ते 7 फूटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे स्थानिकांना मोठ्या आर्थिक हानीला सामोरे जावे लागले आहे.

रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानांनाही याचा फटका बसला आहे. चार ते पाच रस्त्यालगतचे स्टॉल वाहून गेले आहेत. महसूल गाव वाडापेठ आणि रुंढे परिसरालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे

पूराच्या पाण्यामुळे रस्त्यालगतच्या दुकानांबरोबरच, घरातील साहित्य, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे. अनेक कुटुंबांनी आपली राहती घरे सोडून सुरक्षित स्थळी आसरा घेतला होता.

प्रशासनाकडून मदतीचा ठोस प्रतिसाद मिळणे अपेक्षित असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.