रुग्णांकडे दुर्लक्ष नको : अतिवृष्टीत अधिक सतर्क रहा

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला डॉ. पाटील यांची भेट

वैभववाडीl प्रतिनिधी :   रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य ती काळजी घ्या. पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करा. अतिवृष्टीच्या काळात रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी शुक्रवारी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. व कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करून अतिवृष्टीने साथीचे आजार उद्भवू नयेत व अशी परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णांना वेळीच योग्य ते उपचार मिळावेत, यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना संपूर्ण जिल्ह्यात अचानक भेटी देऊन येथील कामकाजाचा आढावा घेत जिल्ह्यात अतिवृष्टीत साथीचे आजार वाढू नयेत, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील हे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना सरप्राईज भेटी देत आहेत. शुक्रवारी त्यांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरीसिस सारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व रुग्णांना वेळीच चांगल्या उपलब्ध व्हाव्या यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. यावेळी डॉ. तुषार चिपळूणकर, डॉ. अर्जुन नरोटे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.