पावसाचा जोर कमी झाल्याने सायंकाळी राजापुरात पूर ओसरला

 

मात्र प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा

राजापूर (वार्ताहर): राजापूर शहर आणि तालुका परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. रविवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पडलेल्या मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली नद्याना पूर आला असून पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेतील जवाहरचौकाला वेढा दिला होता. तर अर्जुना आणि कोदवली नद्यांनी ईशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला होता. सकाळी आलेल्या या पुराच्या पाण्यामुळे जवाहरचौकासह छत्रपती शिवाजी महाराज पथ, बंदरधक्का, गणेशघाट, चिंचबांध, वरचीपेठ रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर राजापूर, शिळ, गोठणे दोनिवडे, चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेला असल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. मात्र दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने राजापूरातील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. सायंकाळी पुराच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र हवामान विभागाने दिलेला मुसळधार पावसाचा ईशारा लक्षात घेता व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत.

गुरूवार पासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा फटका मोठया प्रमाणात तालुक्याच्या पश्चिम भागाला बसला आहे. मात्र रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली नद्याना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवाहरचौकात पुराचे पाणी आले असून जवाहरचौकातील पानटपऱ्या, एसटीपीअपशेड पाण्याखाली गेली आहे. तर पुराचा फटका शहर बाजारपेठेला बसला असून बाजारपेठेतील व्यवहार थंडावले आहेत. पुराचे पाणी शहर बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेने व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. तर जवाहर चौकाकडे येणारी एसटी वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.

पुरपरिस्थितीच्या या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसिलदार विकास गंबरे यांनी सकाळी जवाहरचौकाला भेट देत पुराची पाहणी केली. तर पोलिस निरिक्षक अमित यादव यांनी पुरस्थितीची पाहणी केली. तातडीने बंदोबस्त लावत नागरिकांना सहकार्य केले. मात्र हवामान खात्याने दिलेल्या ईशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दीला आहे.