उपजिल्हाधिकाऱ्यांची ‘कराटे किक’…वाळू माफिया…पोलिस…!

शासनाकडून वाळूच्या लिलावाची प्रक्रिया योग्यवेळेत होत नाही. वाळू पट्याचा लिलाव करून शासनाच्या महसूल तिजोरीत येऊ शकणारा असतानाही हा वाळू निविदा प्रक्रिया वेळेत न करता चोरट्या वाळूचा मार्ग प्रशासकीय यंत्रणेकडुनच गेल्याकाही वर्षात मोकळा करण्यात आला आहे.

पूर्वी वाळू पट्याचे लिलाव व्हायचे अलिकडे ते होतच नाहीत. आणि जरी लिलाव प्रक्रिया झाली तरीही चोरट्या मार्गाने वाळूची विक्री केल्याने अशी चोरटी वाळू विक्री करणाऱ्यांना आयती संधीच यातून प्राप्त झाली. चोरट्या वाळू विक्रीचा हा विषय कुठल्या एका जिल्ह्याचा विषय नाही. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि त्याची विक्री सुरू आहे. यामुळेच राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी, तहसिलदार यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना अनेक ठिकाणी आतापर्यंत झाल्या आहेत. या घटना आजवर अनेक घडल्या आहेत. परंतु वाळू माफियांना रोखण्याचा वा त्यांच्या दादागिरीला आवर घालण्याचा प्रयत्न महसूल आणि पोलिस यंत्रणेकडून झालेला नाही. यामागे ‘अर्थ’ पूर्णत: पूर्णपणे दडलेली आहे हे सांगण्यासाठी कोणाची आवश्यकता नाही. हे उघड सत्य आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. रत्नागिरीतील पांढरा समुद्रकिनारी रत्नागिरीच्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला त्या भागात गेल्या असता त्या समुद्र परिसराचे शुटींग करत होत्या. शुटींग करत असताना बेकायदेशीर वाळू नेण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी ट्रक, बोलेरो गाड्या उभ्या असलेल्या पाहिल्या. परंतु तिथे कोणाशीही काहीही न बोलता त्या परत घरी निघत असताना त्या गाड्यांमधील दोघांनी त्यांना अडवुन मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. शुटींग कशाला करता म्हणून विचारणा करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु हर्षलता गेडाम या राष्ट्रीय तायक्काँदो स्पर्धेतील गोल्ड मेडॅलीस्ट असल्याने त्यांनी त्या दोघांनी केलेल्या हल्ल्याला ‘कराटे किक’ देत हल्ला परतवून लावला आहे. वाळू माफीयांची एका महिलेवर हल्ला करेपर्यंत मजल गेली आहे. ही खरंतर फारच गंभिर घटना आहे.रत्नागिरी पोलीस स्टेशनला हर्षलता गेडाम सकाळी ७ वाजता तक्रार देण्यासाठी गेल्या.पंरतु त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी दुपारचा १ वाजला.उपजिल्हधिकारी सारख्या जबाबदार अधिकार्यांच्या बाबतीत पोलीस स्टेशनला अस घडत असेल तर हि बाब अतिशय गंभीर आहे.त्यांचा जबाब तीनवेळा बदलला गेला यावरुन वाळू माफीयांची पहुॅंच कुठवर आहे हे देखील समजून येते. अखेर रत्नागिरी पोलिसात भादवि कलम ३५२, ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिस या अज्ञातांचा शोध घेतात की त्या वाळूमाफियांना अज्ञाताच्या नावे तसेच सोडून देतात हे पहाता येईल. उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या उपजिल्हाधिकारी जरी असल्यातरीही एखाद्या मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिला किंवा पुरूष जर समुद्राचे शुटींग करत असेल तरीही त्यांच्यावर संशयाने हल्ला करण्याचा प्रयत्न ही देखिल गंभिर बाब आहे. आता महसूलमधील कोणी वरिष्ठांनी गेडाम मॅडमनी शुटींग करायला नको होते. असले सल्ले आणि तारे तोडण्याचा बिलकुल प्रयत्न न करता हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई झाली पाहिजे. आज हर्षलता गेडाम यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. उद्या कोणाच्याही बाबतीत असे घडू शकते. कोकणातील किनारपट्टीवर अनेक भागात बेकायदेशीरपणे वाळू काढली जाते. चोरटी वाळू काढून त्याची बेकायदेशीर विक्रीतून अनेकजण मालामाल झाले आहेत. यामध्ये जसे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी गुंतले आहेत. तसेच पोलिस आणि राजकिय पुढारीही या चोरट्या वाळू व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह आणि पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी हर्षलता गेडाम यांच्यावर झालेला हल्ला ती घटना गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. वाळू माफियांची हिम्मत वाढू देऊ नहा असे जनतेला अपेक्षित आहे.