वार्ताहर l पाली : तालुक्यातील खानू केंद्रातील जि.प. प्राथमिक शाळा नाणीज क्र. १ शाळेत प्रवेशोत्सव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी नाणीज गावचे सरपंच विनायक शिवगण,पोलिस पाटील तथा तक्षशिला पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे,निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप भागवत,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निशा बेंडल,शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीराम दाणी,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मुग्धा रेवाळे,अंगणवाडी सेविका अनिषा काजरेकर,वैष्णवी गावडे यांसह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम बाजारपेठेतून प्रभातफेरी काढून वातावरण निर्मिती करण्यात आली. यानंतर इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व मुलांना औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . याचवेळी सर्व मुलांच्या पायांचे ठसे रंगांमध्ये पाय ठेवून कागदावर घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांनी हात धरून वर्गात आणले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक सौ.स्मिता पाटील यांनी केले.यानंतर सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मोफत प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तके,गणवेश , शूज यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिक मनोजकुमार खानविलकर यांनी केले.











