फोंडाघाट – सुतारवाडी जि. प. शाळेत नवागतांचा स्वागत सोहळा संपन्न. !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी— शाळेचा पहिला दिवस, आज फोंडाघाट पंचक्रोशीतील वाडी- वाडीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मधून, प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला. यामध्ये नवागतांसह, विद्यार्थी विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि पालक महिला- पुरुष, ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. बहुतांश शाळा रांगोळ्यांनी आणि स्वागताच्या सेल्फी पॉईंट्स नी सजल्या होत्या. सकाळी वाद्यांच्या आणि घोषणांच्या जयजयकारात प्रभात फेरीने प्रशालेच्या आवारात मुलामुलींचे आणि ग्रामस्थ पालकांचे आगमन झाले. त्यानंतर शिक्षकांनी स्वागत करून इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचे, आपल्या प्रशालेतील पहिले पाऊल कुंकूजलात भिजवून कागदावर उमटवले आणि पहिल्या दिवसाचे स्मरणचित्र पालकांना भेट दिले. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक मुला-मुलींचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर नवागतांना शालेय पुस्तके आणि गणवेश वाटप करण्यात आले.
या प्रवेशोत्सव प्रसंगी अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहा सामंत यांनी, नवागतांचे स्वागत करून ” जि. प. ची प्राथमिक शाळा — माझी शाळा ” ही भावना प्रत्येक पालक आणि पाल्य यांनी जोपासली पाहिजे. इथे भौतिक सुविधांपेक्षा शैक्षणिक आणि दर्जेदार संस्कार- शिस्तीच्या मुशीतून आदर्श विद्यार्थी तयार होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मुख्या.संजय सावंत,अध्यक्ष हेमंत फोंडेकर, संजना लाड, स्नेहलता पांचाळ, मानसी सावंत, प्रीती फोंडेक,र निलेश कडूलकर, मंगेश फोंडेकर, सहशिक्षिका दर्शना हुंबे, श्रीकृष्ण ठाणेकर, ग्रामस्थ, पालक वर्ग ,शाळा व्यवस्थापन समिती, शि.पा. संघ, इत्यादी उपस्थित होते.












