राजन लाड l जैतापूर –ऐतिहासिक यशवंतगड किल्ल्यावर सुरू असलेली दुरुस्ती व पुनरुत्थानाची कामे सध्या पूर्णपणे अर्धवट स्थितीत थांबलेली आहेत. कामांच्या दरम्यान सुमारे साडेतीनशे फूट खोल खोदलेली बोरवेल उघड्या स्वरूपात धोकादायक स्थितीत पडून आहे, तसेच एक भिंत कोसळूनही ती दुरुस्त करण्याची कोणतीही हालचाल अद्याप सुरू झालेली नाही.
या गंभीर परिस्थितीकडे नाटे सरपंच संदीप बांदकर यांनी लक्ष वेधत ठेकेदार व प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काम अर्धवट, धोक्याचे वातावरण
सदर दुरुस्ती प्रकल्पाचा एक भाग म्हणून बोरवेल खोदण्यात आली होती, परंतु ती न झाकता उघडी ठेवण्यात आली आहे. एक भिंत अर्धवट कामकाजातच कोसळली असून, त्याभोवती कोणतीही चेतावणी चिन्हे, सुरक्षा कठडे किंवा सुधारणा सुरू झाल्याचे चिन्ह नाही.
कामगारांचा निवारा व घाण तशीच
कामगारांसाठी काढलेली तात्पुरती झोपडीनुमा निवारा व्यवस्था आणि परिसरात निर्माण झालेली घाण आजही तशीच आहे. कामगार व ठेकेदार दोघेही परागंदा झालेले असून, गेले कित्येक आठवडे या परिसरात कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही.
प्रशासनाचे दुर्लक्ष
“काम थांबले, बोरवेल उघडी, भिंत पडलेली, घाण पसरलेली – आणि ठेकेदाराचा मागमूसही नाही. हा प्रकार जनतेच्या जीवाशी खेळ करणारा आहे,” असे तीव्र शब्दांत सरपंच संदीप बांदकर यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी ग्रामसभा, तहसील कार्यालय आणि संबंधित पुरातत्व विभागाकडे तक्रार सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षा, आरोग्य आणि ऐतिहासिक वारसा धोक्यात
स्थानिक नागरिक, पर्यटक आणि मुलांसाठी हे सर्वच धोकादायक बनले असून, यशवंतगडचा ऐतिहासिक वारसाही अशा दुर्लक्षित होत आहे. शासनाच्या नियमांनुसार बोरवेल झाकणे, अर्धवट काम तात्काळ पूर्ण करणे, आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी आहे.
स्थानीयांची मागणी
ग्रामस्थांनी एकमुखीने ठेकेदाराची चौकशी, बोरवेल झाकण्याची तातडीची कारवाई तसेच कामाची गुणवत्ता व खर्च याची तपासणीही केली जावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.










