अपघातात मोटरसायकलवरील दोघेही जखमी
देवगड : प्रतिनिधी
मोटरसायकल आणि टेम्पो मॅक्स यांच्यात धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हा अपघात देवगड–नांदगाव मार्गावर घाटे पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी सायंकाळी ६ वा. सुमारास झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथील मच्छिंद्र काळे (रा. पडवणे) व मनोज वसंत जाधव (रा. किल्ला) हे शुक्रवारी सायंकाळी मोटरसायकलने पेट्रोलपंपाकडे जात होते. याच दरम्यान जामसंडे येथील आशिष मुंबरकर (रा. मिठमुंबरी) हा मॅक्स टेम्पो घेऊन कावलेवाडी रस्त्याकडे वळत असताना टेम्पोला मोटरसायकलची धडक बसली. या अपघातात मोटरसायकलवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले, मात्र अपघाताची उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये नोंद नव्हती.











