मातोंड गावातील१८० व पेंडूर गावातील ८० कुटुंबांना पाण्याचा प्रश्न निर्माण…
वेंगुर्ले : प्रतिनिधी
तालुक्यातील मातोंड ग्रामपंचायतच्या मालकीची असलेली सुमारे २९ वर्ष जुनी पेंडूर गावातील सातवायंगणी येथील नळपाणी पुरवठा योजनेची विहीर पावसामुळे कोसळून विहिरी सहित पंप, पाईप व इतर साहित्य मिळून मातोंड ग्रामपंचायतचे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. मातोंड गावातील सुमारे १८० व पेंडूर गावातील सातवायंगणी भागातील सुमारे ८० कुटुंबांना पाणी पुरवठा करणारी ही विहीर होती.
मातोंड व पेंडूर या दोन गावांचे विभाजन होण्याच्या अगोदर १९९५ रोजी जीवन प्राधिकरण योजने अंतर्गत ही मातोंड – सातवायंगणी नळपाणी पुरवठा योजना मंजूर होऊन १९९६ साली या विहिरीचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर पेंडूर व मातोंड गावांचे विभाजन झाल्यानंतर सुद्धा या योजनेचे पाणी मातोंड सावंतवाडा, मधलावाडा, गावठणवाडी तसेच पेंडूर गावातील सातवायंगणी, नेवाळेवाडी भागातील घरांना सुरू होते. दरम्यान रविवार २२ जून रोजी सकाळी पावसामुळे ही विहीर कोसळली. यामुळे विहीरी सहित, पंप, जी.आय. पाईप, आय बिम, लोखंडी जाळी, रिटर्निंग वॉल, गेट वॉल असे मिळून सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, पंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, दीपेश परब, सुजाता सावंत, माजी उपसरपंच सुभाष सावंत, पेंडूर ग्रा प सदस्य निलेश वैद्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर आज ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ही विहीर कोसळल्याने पेंडूर सातवायंगणी व मातोंड येथील काही घरांना पाणी पुरवठा बंद राहिल्याने त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र लवकरच मातोंड व पेंडूर दोन्ही ग्रामपंचायत व ग्रामस्थांची एकत्रित बैठक लावून यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांनी संगितले..
फोटो: मातोंड ग्रामपंचायतची सातवायंगणी येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या कोसळलेल्या विहिरीची पाहणी करताना सरपंच मयुरी वडाचेपाटकर, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता शिंदे, ग्रा प सदस्य दिपेश परब, राहुल प्रभू आदी.












