आम्हाला कचऱ्याच्या प्रदूषणात मारायचे आहे का?  

कोत्रेवाडीतील रणरागिणींचा संताप, डंपिंग ग्राऊंड रद्द करण्याची मागणी 

संतोष कोत्रे l लांजा -: शासकीय निकषात बसत नसतानाही जोर जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रेटून नेऊन आम्हा ग्रामस्थांना कचऱ्याच्या प्रदूषणात मारायचे आहे का? असा संतप्त सवाल कोत्रेवाडी महिलावर्गाने उपस्थित केला आहे.

लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे

कोणत्याही शासकीय निकषात न बसणारा डंपिंग ग्राउंड प्रकल्प जोर जबरदस्तीने राबवण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदी लोकवस्तीलगत हा प्रकल्प असल्याने कोत्रेवाडी ग्रामस्थांकडून गेल्या चार वर्षांपासून या विरोधात आंदोलन आणि उपोषण सुरू आहेत.तीव्र लढा ग्रामस्थांचा सुरू आहे .मात्र तरीही प्रशासनाकडून आणि संबंधितांकडून दाद दिली जात नसून हा प्रकल्प याच जागेवर करण्याचा अट्टाहास केला जात आहे . त्यापेक्षा तो रद्द करण्यात यावा किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी महिलावर्गाने केली आहे.

या पार्श्वभूमीवर कोत्रेवाडी ग्रामस्थांची एक संयुक्त बैठक पार पडली होती.या बैठकीत महिलावर्गाने डंपिंग ग्राऊंड प्रकल्प विरोधात संताप व्यक्त केला होता.आमच्या घरातील पुरुष मंडळी या वाडीला देशोधडीला लावणाऱ्या प्रकल्पा विरोधात गेल्या चार वर्षांपासून लढत असताना प्रशासन अशा चुकीच्या पद्धतीने काम का करत आहे? जर कुवे येथील शासकीय जागेतील कचरा टाकण्याचे प्रशासन बंद करत असेल तर आम्ही माणसे आहोत की नाही? आम्हाला कचऱ्याच्या धुरात, कचऱ्याच्या प्रदूषणात मारायचा नगरपंचायत प्रशासनाचा विचार आहे का? त्यांचा हा डाव आहे का ? तसे असेल तर त्यांचा तो प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला आहे.

दरम्यान, मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी आयोजित केलेल्या एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणा नंतरही प्रशासनाने काहीच भूमिका घेतली नाही तर

भविष्यात हा लढा अधिक तीव्रपणे करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून जोपर्यंत हा प्रकल्प आमच्या इथून हद्दपार होत नाही किंवा प्रशासनाकडून तो रद्द केला जात नाही त्या तोपर्यंत या विरोधात वारंवार आंदोलने ,उपोषण करून आमचा संघर्ष हा अधिक जोमाने करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.