टप्पा वाढीसाठी निधी न दिल्यास ८,९ रोजी राज्यव्यापी शाळा बंद ची हाक

शिक्षक समन्वय संघाचा निर्णय

गौरव पोंक्षे l माखजन :   राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पा वाढीसाठी सलग तिसऱ्या अधिवेशनात देखील आर्थिक तरतूद न झाल्याने राज्यभर शिक्षकांचा असंतोष उफाळून आला आहे.या मागणी साठी आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाचे ५ जून पासून आंदोलन सुरू आहे.या अधिवेशनात आर्थिक तरतूद केली जाईल असा शासनाकडून शब्द देण्यात आला होता.परंतु तरतूद झाली नसल्याने याच्या निषेधार्थ राज्यभर ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघातर्फे देण्यात आला आहे.या संबंधीचे पत्र शिक्षक समन्वयकांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री याना दिले आहे.

महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानावर सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना १ जून २०२४ पासून वाढीव टप्पा दिला जाईल असे गतवर्षी पावसाळी अधिवेशनात घोषित केले होते.१० ऑक्टोबर च्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तबही झाला व १४ ऑक्टोबर ला शासन निर्णय जारी झाला.पर्यंतु शासनाकडून स्वतःच्याच शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.

शिक्षकांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकार ला वेळ नसल्याने सध्या शिक्षक वर्गाकडून सरकारवर टीकेची झोड उठत आहे.शासन निर्णय जारी होऊन आठ महिने उलटले तरी अंशतः अनुदानित शिक्षकांना लाभ का देऊ शकलो नाही असा सवाल शिक्षक व पदवीधर आमदार सभागृहात करत आहेत.शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी तर १० ऑक्टोबर चा जी आर म्हणजे सरकारची जाहिरात बाजी का ?अशी बोचरी टीका करून सवाल उपस्थित केला.

शासन निर्णय झाल्यावर हे तिसरे अधिवेशन होत आहे.परंतु जाणीवपूर्वक शिक्षकांची फसवणूक केली जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.निरंजन डावखरे,आ.ज.मो.अभ्यंकर,आ किशोर दराडे,आ सुधाकर अडबाले,आ.सतीश चव्हाण,आ.किरण सरनाईक,आ.मनीषा कायंदे, आ.अभिजित वंजारी, आ.जयंत आसगावकर,आ.सत्यजित तांबे असे सगळेच विधांपरिषदेमधले शिक्षक व पदवीधर आमदार एकत्रित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांना भेटून टप्पा वाढीसाठी निधी द्या असे सांगून ही हा विषय मार्गी लागत नसल्याने शिक्षक वर्गातून तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.एकाच विषयासाठी एवढे आमदार जर एकत्र येत असतील तर या विषयाचे गांभीर्य शासनाला कळायला हवे.

शासनाच्या या उदासीन धोरणामुळे ८ व ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलनाची हाक देण्याची वेळ शिक्षक समन्वय संघावर आली आहे.८,९ जुलै रोजी शाळा बंद ठेवत शिक्षकांचा ,शिक्षक सागर मुंबई च्या आझाद मैदानावर होणार आहे.यातून आंदोलनाला हिंसक।वळण लागण्यास शासनाची जबाबदारी असेल असे सांगण्यात येत आहे.