खेड(प्रतिनिधी)
कोकणा मधील खेड तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक भात लावणीची लगबग सुरु असून ग्रामीण भागातील शेतकरी सद्या शेता मध्ये लावणी करत असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे
तुफान कोसळणा-या पावसाने काही अंशी विश्रांती घेतली होती मात्र पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील डोंगर उतारावरील भातशेती करणारे शेतकरी पावसाची वाट बघणारे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. सध्या कोकणात शेतकरी वर्ग आजही पारंपरिक पद्धतीने शेती करीत असले तरी काही शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करायला लागले आहेत. ग्रामीण भागात सध्या बैलांची संख्या कमी झाल्याने बैलांचा किंवा रेड्यांचा नांगर दिसणे दुरापास्त झाले आहे. बहुतांश शेतकरी छोटे ट्रॅक्टर, पाॅवर ट्रिलर ने शेती करतांना दिसत आहेत. मात्र, छोट्या भातशेतीत हे ट्रॅक्टर किंवा पाॅवर ट्रिलर फिरवणे अवघड असल्याने आमचा नांगरच बरा असेही म्हणणारे शेतकरी आहेत. पण सध्या ग्रामीण भागात वर्षभर बैल सांभाळण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत होतांना दिसत आहे.

पारंपरिक भात बियाण्यांऐवजी सध्या विकसित भात बियाणे खरेदी विक्री संघातून शेतकरी खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा शेतीचे उत्पन्न वाढण्यास सुरुवात झाली आहे. काही अंशी शेतकरी भात लागवड हे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करतात. त्यामुळे भातशेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. व शेतकरी वर्गाला आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
ग्रामीण भागातील शेती ही पुर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असली तरी काही ठिकाणी छोटे छोटे ओढे व नदीच्या पाण्याचे पाट काढून शेतात वळवले जातात व शेतीची कामे हुरकली जातात. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्याने भात लावणी लवकर सुरु झाली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी हालवे बियाणे वापरले आहे. त्यांच्या कापणीचा कालावधी हा साधारण पणे संप्टेंबर अखेरीस असतो. त्यावेळी असाच पाऊस सुरु राहिला तर तयार झालेली भातशेती कापता येईल का अशीही भीती काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे.













