जनतेला भेडसावणाऱ्या वीज समस्यांचा पंचनामाच केला ; भरीव निधीची आग्रही मागणी
कोकणातील वीज प्रश्नी स्वतंत्र बैठक चालू अधिवेशनात घेणार : ऊर्जा राज्यमंत्री यांचे आश्वासन
अमित खोत | मालवण : जनतेच्या प्रश्नांचा आवाज पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आमदार निलेश राणे यांच्या रूपाने घुमला. गुरुवारी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा ज्वलंत प्रश्न मांडल्यानंतर शुक्रवारी लक्षवेधीच्या माध्यनातून वीज समस्यांचा पंचनामाच केला. आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषाणातून मालवण कुडाळ तालुक्यातील वीज प्रश्न व वस्तुस्थितीचा पुर्ण लेखाजोगा सभागृहासमोर ठेवला. मागील दहा वर्षात काहीच झाले नाही. 2008 पासून जुना वीज विकास आराखडा यातून काहीच झाले नाही. देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा पैसे नाहीत. किती वर्षे सहन करायचे? आता किरकोळ निधी नको भरीव निधी मिळावा. पुढील 25 वर्षाचा प्लॅन हवा. अशी आग्रही आणि आक्रमक मागणी आमदार निलेश राणे यांनी केली.
कोकणात पाऊस हा निकष लक्षात घेता वीज समस्या आणि उपाययोजना याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करा. अशीही मागणी आमदार निलेश राणे यांनी केली. दरम्यान, ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर यांनी सुरु असलेली कामांची माहिती दिली. तसेच संपूर्ण कोकण विभागातील आमदारांची स्वतंत्र बैठक चालू अधिवेशनात घेऊन कोकणात सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
राज्यात मे महिन्यात मोठया प्रमाणात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणासह इतर जिल्हयामध्ये झाडे, घरे, विद्युत खांब, रस्ते आदिंचे मोठे नुकसान झाले. जिल्हयात आधीच विद्युत तारा व ऊपकरणे अत्यंत जीर्ण व जुन्या झालेल्या असल्याने वीज वितरण यंत्रणेची दयनीय अवस्था झाली. जिल्हयात विजेचे खांब पडून अनेक ठिकाणी नुकसान झाले, दुर्घटना घडल्या. पावसाळयात वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, बहुतांश गावे अंधारात असणे, शहरातील अनेक वीज खांब कमकुवत होणे, वीज वाहिन्या लोंबकळत असणे, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका पोहचण्याची भीती आहे. तर सतत खंडित होणारा व काही ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.
ऐन पर्यटन मालवण शहरात हंगामात देवबाग, तारकर्ली, वायरी परिसरात अत्यंत कमी दाबाच्या वीज पुरवठयामुळे वीज उपकरणे बंद होत असल्याने पर्यटकांची मोठी गैरसाय झाली. पर्यटन व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. या भागात स्वतंत्र वीज उपकेंद्र तसेच नव्याने बसविण्यात आलेल्या विदयुत रोहित्रांची जोडणी आणि भूमिगत वीज वाहिन्यांच्या असमाधानकारक कामांमुळे तिन्ही गावातील पर्यटक व्यावसायिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन संबंधित अधिकारी तसेच संबंधित ठेकेदाराला धारेवर धरले होते. तिन्ही गावासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र देण्याबाबत मागणी होऊनही महावितरण कडून
कार्यवाही झालेली नाही.
जिल्हयातील विजेच्या यंत्रणेला अद्ययावत करण्यासाठी जुना वीज विकास आराखडा बदलला पाहिजे. जास्त निधीची आवश्यकता आहे. तो निधी आम्हाला मिळालाच पाहिजे. यांसह विजेच्या समस्या बाबत आमदार निलेश राणे यांनी सभागृहात लक्षवेधी भुमिका मांडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला वीज विभागाचे चिफ इंजिनिअर नाहीत. सगळा कारभार रत्नागिरीत दिडशे किलोमीटर लांब. या चीफ इंजिनिअर सोबत झालेला बैठकीत अवकाळी पावसात कुडाळ मालवण मध्ये 200 पोल कोसळले याची नोंद मात्र मिळाले फक्त 15. सगळे सुरळीत होणार कधी?
कोकणच्या वीज यंत्रणेचा डीपीआर झाला 2008 मध्ये. दुरुस्ती देखभाल साठी किरकोळ पैसे मिळतात. त्याच्यात वीज दुरुस्ती होऊ शकत नाही. माझ्या पाहणीत एका वीज कर्मचारी यांनी जुना वीज खांबावरील बॉक्स उघडला त्यात मेलेला साप सापडला. काय चालले काय?
सायक्लोन रिस्क पैसे दहा वर्षात आलेच नाहीत. आरडीएसएस स्कीम मध्ये फक्त 10 टक्के पैसे. दहा वर्षात काहीच झाले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 90 टक्के कंत्राटी कामगार. यातील 11 जणांनी प्राण गमावले. प्राण परत येणार का? कोण देणार नुकसान भरपाई. ठेकेदार डिपार्टमेंट एकमेकाकडे बोट दाखवते. त्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.
कोकणात वीज यंत्रणेचा 2008 चा जुना डीपीआर सुधारून हवा.
कमी दाब, उच्च दाब पैसे अखर्चित आहेत. दुरुस्ती आणि देखभाल साठी 10 वर्षे पैसे नाहीत. असेही आमदार यांनी सांगितले.
किरकोळ पैसे नको भरीव निधी द्या
मोठया संख्येने पर्यटक मालवणात येतात. मात्र लाईट जाते चार चार दिवस येत नाहीत. किती वर्षे सहन करायचे? उपाय सांगा? सगळ्या वीज स्कीम मधून पैसे मिळावेत. मागील 10 वर्षे काहीच मिळाले नाही. कोकण काहीच मागत नाही. 10 वर्षे सुविधा नाहीत. आम्हाला आता मिळालेच पाहिजे. किरकोळ पैसे नको भरीव निधी द्या. अशी आग्रही आणि आक्रमक मागणी लक्षवेधी माध्यमातून आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
कोकणात सुरळीत वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना
ऊर्जा राज्य मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी भूमिगत वीज वाहिनी, नव्या योजनेतून सुरु असणाऱ्या कामांची माहिती दिली. वादळी वारे यामुळे नुकसान पाहता विविध योजनेतून कामे सुरु असल्याचे सांगितले. दोन वर्षात कामे पुर्ण करून वीज समस्या सोडवण्यावर प्राधान्याने कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. तसेच मालवण वायरी तारकर्ली देवबाग येथील कमी दाबाचा वीज समस्या सोडवण्यासाठी दोन कॅपेसीटर उपकेंद्रात बसवण्यात येणार. मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या विशेष दुरुस्ती उपाययोजना साठी केलेल्या मागणीतून 36 कोटी निधीतून कामे सुरु आहेत. आणीही निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध होईल. असेही मंत्री यांनी सांगितले.











