हनुमान व्यायाम शाळेतील नवीन व्यायाम साहित्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजनमधील निधीतून चिपळूण नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयामध्ये असलेल्या हनुमान व्यायाम शाळेसाठी उपलब्ध करून दिलेल्या १४ प्रकारच्या नवीन व्यायाम साहित्यांचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी सकाळी संपन्न झाले.
नगर परिषदेच्या आरोग्यवर्धन आणि युवकांमध्ये व्यायामाचे संस्कार रुजवण्यासाठी उचललेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. आधुनिक व्यायाम साहित्याच्या सुविधेमुळे व्यायामशाळेतील नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. जिल्हा नियोजन निधी मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला असून, चिपळूणमधील नगरपरिषदेच्या विविध विकासकामांमध्ये ही आणखी एक मोलाची भर ठरली आहे. या लोकार्पण सोहळ्याला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, माजी नगरसेवक परिमल भोसले, नगरसेविका स्वाती दांडेकर, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, नगरसेवक वासुदेव मेस्त्री, नगरसेवक निहार कोवळे, नगरसेविका अदिती देशपांडे, नगरसेविका रिहाना बीजले, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, उद्यान विभागाचे बापू साडविलकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, शहर प्रमुख सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. हनुमान व्यायाम शाळेतील नव्या सुविधांमुळे चिपळूणमध्ये फिटनेस संस्कृतीला चालना मिळणार असून, युवकांसह सर्व वयोगटातील नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नगर परिषदेने आरोग्यदृष्ट्या उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.