मुसळधार पावसाने मंडणगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

 

मंडणगड | प्रतिनिधी : जुलै महिन्यात काही दिवस विश्रांती घेणारा मान्सुन पावसाने तालुक्यात जोरदार पुनरागमन केल्याने 15 जुलै 2025 रोजी तालुक्यात सरासरी 114 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यात मंडणगड महसुल मंडळात 130 मिलीमीटर, म्हाप्रळ महसुल मंडळात 70 मिलीमीटर देव्हारे महसुल मंडळात सर्वाधीक 150 मिलीमीटर तर वेसवी महसुल मंडळात 106 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

पावसाचे हंगामास सुरुवात झाल्यापासून (15) जुलै2025 अखेर तालुक्यात एकूण1402.5 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सावित्री या मुख्य नदीसही भारजा, निवळी या उपनद्या व गावागावातील ओढे व पऱे यामध्ये पाण्याची पातळी वाढली व ते दुथडी भरुन वाहिल्याने गावागावातील लहान मोऱ्या व पुलांवरुन पाणी गेल्याने ग्रामिण भागाचा तालुक्याचे ठिकाणी असलेला संपर्क काही काळाकरिता तुटला. सोमवारी रात्रीनंतर तालुक्यात पावसाने खऱ्या अर्थाने रौद्र रुप धारण केले. पावसाची सततधर सुरु झाली व मंगळवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात सुरु राहीली. पावासामुळे तालुक्यातील केळवत, तुळशी, शेनाळे, पालवणी, उमरोली या घाटांमधील माती रस्त्यावर वाहून आली मात्र त्याचा परिणाम वाहतूकीवर झालेला दिसून आला नाही. भिंगळोली येथे मुख्यरस्त्याला पाणी भरल्याने मुख्य रस्त्याचे आजुबाजूच्या परिसरात पाणी शिरले. ग्रामिण भागात अनेक लहान मोऱ्यांवरुन पाणी गेल्याने विद्यार्थ्यांची शाळेची अडचण निर्माण झाली. प्रामुख्याने सुर्ले येथे पुलावरुन पाणी गेल्याने पाट, सुर्ले, गवाणवाडी, मनवळ कोंड, ढांगर, बुरी, गोवेले, सुर्ले गावठाण या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक बंद झाल्याने शिक्षक व ग्रामस्थांची अडचण झाली. पंचायत शिक्षण विभागाने त्या त्या ठिकाणी परिस्थिती पाहून शालेय व्यवस्थापनाने शाळेचे कामकाज चालवावे अथवा नाही या संदर्भात निर्णयाचे अधिकारी बहाल केल्याची माहीती मिळाली आहे.

शहरातील शाळा व महाविद्यालयांचे कामकाज सुरु होते. ग्रामिण भागात मात्र काही ठिकाणी पावासाची परिस्थिती पाहून शाळांना सुट्टी देण्यात आली. जागोजागी पाणी भरल्याने पंदेरी, अडखळ, वलॏते, लाटवण, विसापूर, चिंचघर मार्गावरील स्थानीक बसफेऱ्या बंद असल्याची माहीती आगार व्यवस्थापनाने दिली आहे. याचबरोबर पाणी ओसरल्यावर गाड्या पुर्ववत सुरु होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाने तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसुल विभागाचे माध्यमातून सुरु करण्यात आले आहे.