संतोष वायंगणकर
कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिला त्याच्या कर्तृत्वाला वाव मिळतोच असं नाही. त्याची कारण कोणतीही असोत परंतु आपल्या अवती-भवतीची अनेकांच्या आयुष्यात ते ज्या जागी असायला हवे होते त्या जागा त्यांना खुणावतात. परंतु विराजमान होता येत नाही. मग इथे पुन्हा ‘नशीब’ हा शब्द आठवतो. अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक असलेले सावंतवाडी माझगावचे विकासभाई सावंत यांचे मंगळवारी वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.
माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत हे विकासभाईचे सुपूत्र होते. विकासभाईंच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. राजकारणातील एक अभ्यासू, निष्ठावंत आणि अजातशत्रू व्यक्ति म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे होते. सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती नंतर स्थापन झालेल्या पहिल्या जिल्हा परिषदेचे ते वित्त व आरोग्य सभापती होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आर.बी.दळवी होते. त्याकाळी पत्रकार म्हणून अनेकवेळा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित रहाता आलं. विकासभाई सावंत यांची अभ्यासपूर्ण भाषणं, जिल्हा परिषद सभागृहातील प्रश्नांची दिलेली उत्तरे यामध्ये विकासभाईंचा आत्मविश्वास आणि अभ्यासूपणा सहज लक्षात यायचा. कोणत्याही राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तिचा त्या-त्या विषयांचा अभ्यास असेल तर निश्चितच त्या व्यक्तिमत्वाची छाप समाजमनावर आपोआप पडत असते. जिल्हा परिषद अधिनियमांचा विकासभाईंचा गाढा अभ्यास होता. त्यामुळेच जिल्हा परिषद प्रशासनातील कोणीही अधिकारी कधी चुकीची माहिती त्यांच्यासमोर ठेवत नसत. राजकारणात संयमीतपणेही उत्तम मांडणी करण्यात विकासभाईंचा हातखंडा होता. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेत वाढलेल्या विकासभाई सावंत यांनीही काँग्रेसी विचारधारेतच निष्ठावंत म्हणून रहाण्याचा निर्णय घेतला. विकासभाई सावंत यांचे वडील हे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे स्व.भाईसाहेब सावंत यांच्या निधनानंतर काँग्रेसमधील शरद पवार गटाने त्यांना कधी आपले मानले नाही. काँग्रेसच्या सर्व बदलत्या राजकारणातही विकासभाई काँग्रेसमध्येच राहिले. पक्षनिष्ठेच्याबाबतीत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. राजकारणातील ते अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. जसे ते काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय होते तसेच ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातही ते कार्यरत होते. संस्थामधील शिस्तीला त्यांचा प्राधान्यक्रम होता. सहकारक्षेत्रातही कार्यरत होते. काहीकाळ विकासभाई सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. सफेद सदरा, झब्बा असा सरळ पेहराव चेहऱ्यावर अभ्यासू प्रतिमेचे घडणारे दर्शन सतत हसणारा चेहरा कोणाशीही संवाद साधण्याची मानसिकता अशा गुणवैशिष्ट्याच त्यांच व्यक्तिमत्व होत. राज्याच्या शिखर बँकेवरही विकासभाईंनी काम केलं होतं. राजकारणात जसा अभ्यासूपणा महत्वाचा आहे तसच त्या-त्या व्यक्तिमत्वात राजयोगही फार महत्वाचा आहे. केवळ बुद्धीमत्ता, हुशारी असूनही संधी मिळतेच असं नाही. अनेकांच्या आयुष्यात राजयोग येत नाही. वर्षानुवर्षे माणसं काम करत रहातात. परंतु त्यांच्या आयुष्यात राजयोग नसतो हे वास्तव आहे. राजयोगाचे भाग्य सर्वांच्याच नशीबी नसते. विकासभाई सावंत त्याअर्थाने राजयोग नसलेले राजकीय नेते होते. गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून देखिल त्यांनी त्यांच्या स्वत:च्या राजकारणाची एक चौकट आखून घेतली होती. त्या चौकटी पलिकडे विकासभाई सावंत कधी गेले नाहीत. काँग्रेसपक्षाने खरतर विकासभाई सावंत यांना कधीच काही दिलं नाही. काँग्रेस पक्षात नेहमीच गटबाजीला महत्व राहिले. विकासभाई सावंत हे असल्या गटा-तटाच्या राजकारणापासून दूर राहिलेले व्यक्तिमत्व होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान विकासभाई सावंत यांनाच मिळाला असता. परंतु तेव्हा काँग्रेसतंर्गत असणाऱ्या माजी राज्यमंत्री प्रविण भोसले आणि कर्नल सुधीर सावंत गटा-तटाच्या राजकारणात विकासभाई सावंत बाजूला राहिले. अर्थात जर-तर ला कधीही काहीच अर्थ नसतो. सिंधुदुर्ग जिल्हा राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक अशा विविध क्षेत्राची उत्तम जाण असणाऱ्या एका व्यासंगी, अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्वाला मुकला आहे. विकासभाई सावंत यांच्या जाण्याने सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक आपल्यातून गेला आहे.
विकासभाई सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली !












