मसुरे | झुंजार पेडणेकर :मालवण तालुक्यातील किल्ले रामगडवर दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने श्रमदान मोहीम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. प्रथम गडदेवता आणि श्री गणेशाची ची आराधना करुन शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र घेऊन मोहिमेस प्रारंभ केला.
यावेळी गडावरील गणेश मंदिराचा परिसर साफ करण्यात आला. ऐतिहासिक वास्तूचे जतन करताना या वास्तू स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठांच्या वतीने नेहमीच अशा पद्धतीच्या मोहिमा राबविल्या जातात.
या मोहिमेत दुर्गवीर संस्थेचे मधुकर विचारे, तुषार चव्हाण, सुबोध चव्हाण, शुभम घाडी, रोहन साटम, लक्ष्मण घाडीगांवकर यांनी सहभाग घेतला.
परकीय आक्रमणातून महाराष्ट्रातील जनतेचं ज्या गडकिल्ल्यांनी संरक्षण केलं, छ.शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवलं, स्वराज्याचा कारभार ज्या गडकिल्ल्यांवर चालला तो ऐतिहासिक वारसा जतन व्हावा व पुढील पिढ्यांसाठी टिकून रहावा यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान 2008 पासून अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. गडकिल्ले संवर्धनासोबतच विविध सामाजिक उपक्रम आणि पारंपरिक मराठमोळे सण-उत्सव गडावर साजरे करून गड जागता ठेवत स्थानिकांमध्ये गडांबद्दल आस्था निर्माण करण्याचा दुर्गवीर प्रतिष्ठानचा संकल्प आहे. सदर कार्य हे कुणा एका-दोघांचे नसल्याने दुर्गवीर सोबत या गडसंवर्धन कार्यात सहभागी व्हा असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.










