झोनस्तरीय बाल समागममध्ये दिला विश्व बंधुत्वाचा संदेश

कणकवली : “मुले म्हणजे देवाघरची फुले” ही उक्ती म्हणजे मुलांविषयीची गोड भावना ! ओली माती देऊ तसा आकार घेणारी , ओली फांदी देऊ तसा आकार घेणारी, जसा आकार देऊ तशी घडणारी ही अवस्था , परंतु आताच्या अवती-भवती असणाऱ्या बालकांकडे पाहिलं तर त्यांच्यातील बालपण हरवल्यासारखे वाटते , याचे कारण काय असेल तर ते सध्या धावपळीच्या जीवनात पालकांना बालकांप्रति असणाऱ्या कर्तव्याचा विसर ! याची इतर कारणं देखील तितकीच गंभीर स्वरुपाची आहेत . कुटुंबातील चांगल्या वाईट गोष्टींचा पगडा मुलांच्या मनावर पडत असतो हे मुख्यत्वे. संत निरंकारी मंडळ संस्कारीत पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे झोनस्तरीय निरंकारी बाल संत समागम संपन्न झाला. यावेळी वडोदरा गुजरात येथुन आलेले आदरणीय श्री. मुकेश परमारजी मुख्य मंचावरून बोलत होते.

ते म्हणाले, उत्तम संस्कारांमुळेच मुलांमध्ये सद्भावना , एकता ,समानतेची भावना रुजू होऊ शकते . प्रत्येकाला आपले बालक एक चांगला नागरिक , एक चांगला माणूस बनावा, त्याचे भावी जीवन सुखाने भरलेले असावे असे वाटते . हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मुलांना वाईट विचार व भौतिक व्यसनांपासून दूर ठेऊन अध्यात्माचा आधार घेण्याची प्रेरणा दिली जाईल. त्याचबरोबर कुटुंबामध्ये ऐक्य असणे फार महत्वाचे आहे. आजच्या विज्ञान युगात संस्कारित मुलेच उत्तम समाज निर्माण करु शकतील, याचे कारण निरंकारी परिवारातील मुले बाल सत्संगशी जोडली गेल्याने समाजात वावरताना निरंकारी सद्गुरूंनी दिलेल्या प्रेरणेमुळे त्यांच्यातील कुशलता त्यांच्या कर्मातून दिसते, अभ्यासासोबत माणसाने माणसाशी वागण्याची कला , क्षमा, सहनशीलता , आदर व ऐक्याची प्रेरणा निरंकारी बाल सत्संगच्या माध्यमातून दिली जात आहे यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचा देखील विनाश होऊन विश्वबंधुत्व प्रस्थापित होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केलं.

विज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन मुलांचा अध्यात्मिक, मानसिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी निरंकारी सद्गुरुंच्या कृपाशीर्वादाने www.kids.org ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये कविता ,चित्र रंगवा , विनोद , गोष्टी , शब्द कोडे , सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा इत्यादींचा समावेश असून पालकांनी मुलांना या वेबसाईटवरील विभागामध्ये भाग घेण्याची प्रेरणा द्यावी जेणेकरून मुले मानसिक व आध्यात्मिकतेणे सुदृढ बनून उत्तम समाज निर्मितीस कारण ठरतील . असे आवाहन संत निरंकारी मंडळाकडून करण्यात आले.

सदर समागमदरम्यान नाटिका, कविता, आध्यत्मिक गीत आणि विचारांमध्ये मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. दरम्यान कु.आर्या नार्वेकर, कुडाळ या बलिकेने उत्तम सूत्र संचलन केले.

यावेळी संत निरंकारी मंडळाच्या सेक्टर कणकवलीचे संयोजक श्री. विलास जाधव जी, ब्रम्हज्ञान प्रचारक श्री. विजय मडगांवकरजी आणि जिल्हाभरातून तसेच कोल्हापूर राधानगरी येथून बालके व निरंकारी भक्त या ठिकाणी उपस्थित होते.

सेवादल संचालक श्री. महेश पांचाळ जी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सेवादलच्या बंधू- भगिनींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी बहुमोल सहकार्य केले.