बिळवस श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव उद्या 19 जुलै रोजी!

सकाळी 8.30 वाजता ओट्या भरण्यास होणार प्रारंभ 

मसुरे | झुंजार पेडणेकर :मालवण तालुक्यातील मसुरे गावची मूळमाया अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यातील देवीचा वार्षिक जत्रोत्सव 19 जुलै रोजी संपन्न होत आहे. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्याने मोठ्याप्रमाणात मुंबईकर चाकरमानी, देवीचे राज्याबाहेरील भक्त सुद्धा या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असल्याने भाविकांचा जनसागर यादिवशी बिळवस येथे दिसून येतो. भाविकांची गर्दी दुपारच्या सत्रात वाढत असल्याने यावर्षी

जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता विधीवत पूजन झाल्यानंतर भाविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ होणार आहे. या उत्सवाची सांगता त्याच दिवशी सायंकाळी होणार आहे. दर्शनरांग व्यवस्था पूर्ण झाली असून नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जत्रा परिसरात हंगामी मिठाई व्यापारी, पूजा साहित्य, लहान मुलांची खेळणी आदी व्यापारी दाखल झाले आहेत. भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणे, तसेच ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सातेरी देवालय ट्रस्ट व समस्त बिळवस ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.