सावंतवाडी । प्रतिनिधी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असताना, ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ने पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. नारायण मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर असलेला एक खड्डा नगर परिषदेने बुजवला होता, मात्र केवळ चार दिवसांतच ते काँक्रीट उखडले. यानंतर अपघातांना आमंत्रण देणारा हा खड्डा अखेर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुजवून नागरिकांना दिलासा दिला.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षांपासून ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. नुकताच श्रीराम वाचन मंदिरासमोरील मोती तलावाजवळ रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला होता, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. शाळकरी मुले आणि नागरिकांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडत होते, तसेच हा खड्डा अपघातालाही कारणीभूत ठरत होता.
याची गंभीर दखल घेत, ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांनी रहदारी कमी झाल्यावर आणि पावसाने उसंत दिल्यावर रात्री २ वाजता सिमेंट काँक्रीट वापरून हा खड्डा बुजवला. संस्थेचे सदस्य रवी जाधव यांच्या पुढाकाराने हे काम झाले. यासाठी लागणारे सिमेंट, वाळू आणि खडी संस्थेच्या सचिव समीरा खलील यांनी पुरवली, तर लक्ष्मण कदम, सुजय सावंत, सुरज धुरी आणि रवी जाधव यांनी प्रत्यक्ष कामात योगदान दिले.
यापूर्वीही संस्थेने शहरातील अनेक धोकादायक खड्डे बुजवले आहेत. शहरातील बाजारपेठ आणि शाळा-महाविद्यालय परिसरातील सर्व खड्डे पावसाचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने बुजवण्याचा निर्धार ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ने केला असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी संस्थेने घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.













