रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला: २२ जुलै ते २७ जुलै २०२५

रत्नागिरी – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२ जुलै ते २७ जुलै २०२५ पर्यंतचा हवामान आधारित कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानाचा अंदाज:
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात २२ ते २६ जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ERFS), कोकण विभागात २७ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान पर्जन्यमान, कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.
शेतीवरील संभाव्य परिणाम आणि कृषी सल्ला:
मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्या, तसेच आंबा पिकास देण्यात येणारी पॅक्लोब्युट्रॉझॉलची मात्रा आणि विविध पिकांना देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रा वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील कृषी सल्ला मिळेपर्यंत सर्व संबंधित कामे पुढे ढकलण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पिकानुसार विशेष सल्ला:
* सामान्य सल्ला: नवीन लागवड केलेल्या (साधारणतः २ वर्षांपर्यंतच्या) आंबा, काजू कलमे तसेच नारळ व सुपारीची रोपे कोसळू नयेत यासाठी बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
* विशेष सल्ला: लागवड केलेल्या सर्व पिकांमधून पावसामुळे साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. कीड, रोग नियंत्रण आणि फवारण्या पुढील सल्ला मिळेपर्यंत थांबवाव्यात.
* खरीप भात (पुनर्लागवड/रोपावस्था):
* भात पुनर्लागवडीनंतर पहिल्या ३० दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी २.५ ते ५ सें.मी. ठेवावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* पुनर्लागवडीची कामे पावसाची तीव्रता कमी असताना पूर्ण करावीत. १२ ते १५ सें.मी. उंचीची आणि ५ ते ६ पाने फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार २१ ते २७ दिवसांची रोपे लावणीसाठी वापरावीत.
* जमिनीच्या मगदुराप्रमाणे १५x१५ किंवा २०x१५ सें.मी. अंतरावर लावणी सरळ आणि उथळ २.५ ते ३.५ सें.मी. खोल करावी.
* भात पिकास चिखलणीच्या वेळी प्रति हेक्टरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया), ५० किलो स्फुरद (३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५० किलो पालाश (८४ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. हेक्टरी ५ टन गिरीपुष्पाचा पाला दिल्यास ५०% नत्र खताची मात्रा कमी करता येते.
* डोंगर उतारावरून भात खाचरांमध्ये तीव्र वेगाने पाणी येत असल्यास ते पाणी इतरत्र वळवण्याची व्यवस्था करावी.
* नागली, वरी (पुनर्लागवड/रोपवाटिका व्यवस्थापन):
* रोपे लावणीस तयार झाल्यानंतर लावणीच्या एक-दोन दिवस अगोदर रोपवाटिकेतील वाफ्यांना भरपूर पाणी द्यावे.
* अधिक उत्पन्नासाठी ३० दिवसांची रोपे एका ठोंब्यात दोन याप्रमाणे दोन ओळीत २० सें.मी. आणि दोन रोपात १५ सें.मी. अंतर ठेवून पावसाची तीव्रता कमी असताना लावावीत.
* नागलीच्या अधिक उत्पादनासाठी सपाट व चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी २५ सें.मी. x १० सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी.
* नागलीसाठी हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. नत्र खत दोन हप्त्यांत विभागून द्यावे. पहिला हप्ता (४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि पालाश) लावणीच्या वेळी युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश माध्यमातून किंवा सुफला १५:१५:१५ हेक्टरी २६६ किलो द्यावा. खताची पहिली मात्रा फोकून न देता ठोंब्यातून द्यावी.
* नागली रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* नवीन नारळ लागवड: नवीन लागवड केलेल्या (साधारणतः २ वर्षांपर्यंतच्या) नारळ रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* नवीन आंबा लागवड:
* आंबा पिकांमधील पॅक्लोब्युट्राझोल संजीवकाची मात्रा देण्याची कामे पुढील कृषी सल्ला मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात यावी.
* आंबा बागेमध्ये साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* नवीन लागवड केलेल्या आंबा रोपांमध्ये मर वाढण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* नवीन लागवड केलेल्या (साधारणतः २ वर्षांपर्यंतच्या) आंबा कलमांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
* नवीन काजू लागवड:
* नवीन लागवड केलेल्या (साधारणतः २ वर्षांपर्यंतच्या) काजू कलमांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
* नवीन लागवड क्षेत्रात जास्त पाणी साचल्यास नवीन लागवड केलेल्या काजू रोपांमध्ये मर वाढण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* सुपारी: सुपारी बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* हळद (वाढीची अवस्था): हळद पिकामध्ये साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* वेलवर्गीय भाजीपाला (वाढीची अवस्था): पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी पिके वेल टाकू लागल्यावर त्यांना शिऱ्या लावून आधार द्यावा आणि मंडपाची व्यवस्था करावी. लागवड केलेल्या वेलवर्गीय भाजीपाला पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
* कुक्कुटपालन आणि पशुपालन: कोंबड्यांचे आणि जनावरांचे पावसापासून योग्य ते संरक्षण करावे.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.