राजापूरात शनिवारी जिजाऊ संस्थेच्या स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन

दुपारी २ वाजता व्याख्याते गणेश शिंदे यांचे करिअर मार्गदर्शन

राजापूर (वार्ताहर): जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी विभागाच्या वतीने रत्नागिरीत मोफत रूग्णालय सुरू केल्यानंतर राजापूर तालुक्यातील तरूणांच्या उज्वल भवितव्यासाठी स्पर्धा परीक्षा वाचनालय व करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

राजापूर नगर वाचनालय येथे हे स्पर्धा परिक्षा वाचनालय सुरू करण्यात येत आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवार २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. तर या वेळी दुपारी २ वाजता डॉ. आंबेडकर भवन हॉल येथे करिअर मार्गदर्शन शिबिर होत असून या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन होणार आहे.

जिजाऊ ही संस्था आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. निलेश सांबरे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील तरूणांना त्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी स्पर्धा परिक्षा वाचनालय हे महत्वपुर्ण ठरणार आहे.

या वाचनालयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरात १० वी १२ वी नंतरच्या करिअरच्या दिशा या संदर्भात गणेश शिंदे यांचे मौलिक मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील युवक युवतीनी मोठया संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष एड. महेंद्र मांडवकर तसेच साईराज कोलते, विकास वारिक, मोहन पाडावे, सुभाष नवाळे, प्रशांत गावकर आदींनी केले आहे.