सांगली, सातारा, सिंधुदुर्ग येथे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची लांजा पोलिसांकडून धरपकड
लांजा (प्रतिनिधी) आपण वकील असल्याची बतावणी करत आसगे मांडवकरवाडी येथील एका व्यक्तीची ४५ हजार ११० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी रत्नागिरी नाखरे येथील अट्टल व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीवर यापूर्वी सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे अशा प्रकारे फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे .
या घटने प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथील बाबाजी बुधाजी कोलापटे (वय ६२ वर्षे) यांनी याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. घटनेतील आरोपी जीवन गणपत जाधव (वय ५५ वर्षे राहणार नाखरे रत्नागिरी) याने दिनांक २३ जून २०२५ ते १७ जुलै २०२५ या कालावधीत बाबाजी कोल्हापटे यांना आपण वकील असल्याची बतावणी करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांची वॅगनआर कार भाड्याने घेतली. त्या भाड्यापोटी ३७ हजार रुपये न देता उलट कोलापटे जेल कॅंटीनचे काम देतो असे सांगून त्यांच्या जुना वापरता सॅमसंग कंपनीचा ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच यांच्या पत्नीचा दोन हजार रुपये किमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल हँडसेट घेतला तसेच नातीची शांती करावीच आहे असे सांगून फिर्यादी बाबाजी कोल्हापटे यांचेकडून १११० रुपये किमतीचे ३७ नारळ घेऊन त्यांचेही पैसे न देता कोलापटे यांची एकूण ४५ हजार ११० रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी बाबाजी कोलापटे यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी जीवन गणपत जाधव याला अटक करून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१६(२) आणि ३१९(१) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.











