चिपळूणमध्ये पती-पत्नीची आत्महत्या: पत्नीचा मृतदेह सापडला

पतीचा शोध सुरू

चिपळूण :
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीत उडी मारून तरुण विवाहित जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याला ४८ तास उलटून गेल्यानंतर पत्नी अश्विनी अहिरे (19) हिचा मृतदेह सापडला असून, तिचा पती निलेश अहिरे (26) याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

बुधवारी सकाळी चिपळूणमधील गांधारेश्वर पुलावरून निलेश आणि अश्विनी यांनी नदीत उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना निलेशची दुचाकी पुलाजवळ सापडल्यानंतर या घटनेला पृष्टी मिळाली. तपास सुरू असतानाच, नवाघर परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ओळख पटवल्यानंतर हा मृतदेह अश्विनी अहिरे हिचाच असल्याचे निष्पन्न झाले.

निलेश आणि अश्विनी हे दोघे मूळचे धुळे येथील असून, निलेश गेल्या 10 वर्षांपासून चिपळूणमध्ये राहत होता. निलेश चिपळूण एसटी स्टँडजवळच्या एका मोबाईल शॉपीमध्ये काम करत होता. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या जोडप्यामध्ये झालेल्या वादामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे. विशेष म्हणजे, त्यांचे लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वी झाले होते आणि हे लग्न निलेशच्या इच्छेविरुद्ध झाल्याचीही चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉ. आकाश लिगाडे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र राजमाने, पोलीस निरीक्षक श्री. नेमाडे यांच्यासह सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. एनडीआरएफचे पथक गेल्या दोन दिवसांपासून निलेशचा शोध घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. अश्विनीने उडी मारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तिच्या आत्महत्येची पुष्टी झाली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण शहर हादरले असून, या घटनेबद्दल अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.