आरवली ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांनी थांबवावेत:सुरेश भायजे

गौरव पोंक्षे l माखजन :   शेकडो वर्षांचा इतिहास असणाऱ्या,वैज्ञानिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व असलेल्या गंधकयुक्त गरम पाण्याचे कुंडाची नासाडी करणाऱ्या, केवळ ५० ते ६० मीटर रस्त्या अभावी जनतेला चिखलातून पायपीट करायला लावणाऱ्या व संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी येतो म्हणून सांगून न येणाऱ्या अद्दाम अधिकारी व ठेकेदार यांच्या विरुद्ध जनतेच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी आरवली ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार थांबवावेत असा सज्जड इशारा बहुजन विकास आघाडीचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ,बळीराज सेनेचे उपाध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण मुंबईकडे जाताना डाव्या बाजूचा सर्व्हिस रोड पावसाळ्या पूर्वी मे महिन्यात खोदून ठेवण्यात आलेला होता. त्यावर कोणत्याही प्रकारचे काँक्रिटीकरण न केल्यामुळे चिपळूण मुंबईकडे जाणारी वाहने पुलावरूनच जात असल्याने गेले अडीच महिने आरवली पंचक्रोशीतील प्रवाशांना हा चिखल तुडवत महामार्ग गाठावा लागत आहे .गेले अडीच महिने वारंवार मागणी करूनही सदर ५० ते ६० मीटर रस्त्याचे डांबरीकरण वा काँक्रिटीकरण न केल्यामुळे गेले अडीच महिने प्रवाशांना फार मोठी कसरत करत चिखलातून खडी तुडवत पायपीट करावी लागत आहे.मुंबईकडे जाताना पुलाच्या उजव्या बाजूचा रस्ता जसा काँक्रीटचा करण्यात आला आहे ,त्यावरून आरवली ते संगमेश्वर ते रत्नागिरी जाणाऱ्या गाड्यांची रहदारी सुरू आहे. तसाच डाव्या बाजूचा रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात यावा जेणेकरून ग्रामस्थांचे आरवली ते चिपळूण ते मुंबई जाण्यासाठी होणारे अतोनात होणारे हाल वाचतील.

“क” पर्यटन क्षेत्र असणारे आरवली येथील गरम पाण्याचे कुंड संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीच्या बांधकामामुळे पहिल्याच पावसातील पुरातील चिखल माती कुंडात जाऊन कुंडाचे वैज्ञानिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून केला जात आहे.शिवाय या कुंडाची वाताहत झाल्याने आरवली गावातील या ऐतिहासिक कुंडाच्या इतिहासाला व अस्तित्वाला धक्का पोहचला आहे. या महामार्गावर पूर्वी ब्रिटिश कालीन कमानी टाईप मोरी बांधण्यात आली होती. दगडात पाट कोरून त्यातून उन्हाळ्याच्या बारमाही पाणी नदीत सोडण्यात आले होते.कडेला कट्ट्यावर दगडाची फरशी बांधून त्यावरून गावातील व परिसरातील ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी मार्ग करण्यात आला होता. त्यामुळे महापुराचे पाणी जरी कुंडात घुसलं तरी पाणी ओसरल्यानंतर कुंड व परिसर स्वच्छ राहायचा. प्रतिकूल आणि अत्याधुनिक साधनसामुग्री चा अभाव असताना देखील ब्रिटिश काळात या कुंडाची काळजी घेतली गेली.पण आज मात्र या कुंडाची अवस्था बिकट झाली आहे.ठेकेदाराचा निष्काळजी व बेजबाबदार पण कारणीभूत असून डोळेझाक करणारे अधिकारी तितकेच जबाबदार असल्याचे श्री भायजे यांचे म्हणणे आहे. संबंधित महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांनी कुंडावर येण्या जाण्याचा, व कुंडावरून केदारनाथ मंदिरात जाण्याचा मार्गच बंद करून टाकला , त्यामुळे ग्रामस्थांना कुंडावर येण्यासाठी व केदारनाथ मंदिरात जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुंडातून बारमाही वाहणारे गरम पाणी नदीत सोडण्यासाठी मार्ग ठेवण्यात आलेला नाही. पर्यायाने पुराच्या चिखल मातीचे पाणी कुंडात घुसून पवित्र असे गरम पाण्याचे कुंड या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे कुंड बकाल झाले आहे.

या गंभीर प्रश्नावर आरवली ग्रामस्थांशी विचारविनिमय करण्यासाठी महामार्ग अधिकारी श्री कुलकर्णी यांनी येतो असे सांगितले होते. त्यावेळी ग्रामस्थ उपस्थित राहिले मात्र प्रत्यक्षात ते अधिकारी मिटींगला आलेले नाहीत. अधिकाऱ्यांच्या या अद्दाम वागण्यामुळे ग्रामस्थांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या असून अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या जखमेवर आणखीन मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये. अस भायजे यांनी मत व्यक्त करत तातडीने सदर या समस्या सोडवाव्यात अशी मागणी महामार्ग चौपदरीकरण अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.