महसूल सप्ताहानिमित्त उद्या सावंतवाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’

माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांची उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : महसूल सप्ताहाचे औचित्य साधून उद्या, ४ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. तहसीलदार कार्यालयात सकाळी ११ वाजता आमदार दीपकभाई केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या अभियानात सावंतवाडी, निरवडे आणि माडखोल मंडळातील नागरिकांचा सहभाग असेल.

या कार्यक्रमात नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ मिळणार आहे. यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकांना धनादेशांचे वाटप, संजय गांधी निराधार योजना पेन्शन मंजुरीचे आदेश, तसेच ७/१२, उत्पन्नाचे दाखले आणि जातीच्या दाखल्यांचे वाटप केले जाईल. यासोबतच शिधापत्रिकांचे वितरण व १५५ चे आदेशही दिले जातील. नागरिकांच्या दाखल्यासंबंधीच्या किंवा इतर प्रलंबित महसूल कामांसाठी अर्ज स्वीकारले जातील. १८ वर्षे पूर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी झालेली नाही, त्यांचे अर्जही येथे स्वीकारले जाणार आहेत. सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सर्व नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून आवश्यक दाखल्यांसाठी अर्ज दाखल करण्याचे आणि ज्यांचे दाखले तयार आहेत, त्यांनी ते स्वीकारण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे.