सावंतवाडी-वेंगुर्ला बसस्थानक परिसरात कचरा आणि खड्ड्यांचे साम्राज्य

सावंतवाडी । प्रतिनिधा : प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सावंतवाडी-वेंगुर्ला बसस्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. सध्या या ठिकाणी सर्वत्र वाढलेले गवत, चिखल आणि साचलेले पाणी यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या बसस्थानक परिसरात सर्वत्र घाण आणि कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मोकाट जनावरे आणि डासांचाही उपद्रव वाढल्याने प्रवाशांना बसची वाट पाहणे कठीण झाले आहे. या अस्वच्छतेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवासी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करत आहेत, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन बसस्थानक परिसर स्वच्छ करावा आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अन्यथा, भविष्यात आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.