भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संकल्पना.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी सहभाग घ्यावा.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी आणि शुभेच्छा पाठवण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. “लाडक्या देवाभाऊसाठी एक राखी” या नावाने राज्यभरात हे अभियान ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान राबवले जाणार आहे. अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक बूथवरून १०० राख्या गोळा करून एकूण १ कोटी राख्या आणि शुभसंदेश मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचे नियोजन आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून, जिल्ह्यातील ९२१ बूथवरून प्रत्येकी किमान १०० राख्या जमा करून एकूण १ लाख राख्या प्रदेश कार्यालयात पाठवण्यात येणार आहेत.
जिल्हा भाजपने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन केल्या असून, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर व जिल्हा सरचिटणीस संदीप साटम हे जिल्हा संयोजक असणार आहेत. प्रत्येक मंडलात दोन संयोजक नियुक्त करण्यात आले आहेत.
महिलांना स्वतःची राखी आणि दोन ओळींचा शुभसंदेश आपल्या नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह भाजप कार्यकर्त्यांकडे द्यायचा आहे. यासाठी विशेष लिफाफे घरोघरी दिले जाणार आहेत. ज्या बहिणींशी संपर्क होणार नाही, त्यांनी आपली राखी तालुक्यातील भाजपा कार्यालयात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रमही मागील विक्रमी रक्तदान मोहिमेसारखाच ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेवेळी वेळी भाजपाचे महामंत्री रणजित देसाई, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, उपाध्यक्ष बाळू देसाई, सुहास गवंढळकर, वृंदा गवंढळकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.
विक्रमी रक्तदानानंतर हे अभियान
प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रदेश स्तरावर महत्त्वाकांक्षी अशा संपर्क अभियानाला सुरुवात केलेली आहे.अलीकडेच देवेंद्रजींच्या वाढदिनी २२ जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी १०८८ मंडलात ७८३१३ बॉटल इतके विक्रमी रक्त संकलन केले,या विक्रमाची जागतिक स्तरावर नोंद झाली.असेच हे अभियानही विक्रमी असणार आहे.










