लांजा कुवेत बचाव समिती करणार १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण
संतोष कोत्रे
लांजा-: सातत्याने विरोध दर्शवूनही लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळत नसल्याने अखेर लांजा कुवे बचाव समितीने आक्रमक पवित्रा घेतल्या असून विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक
उपोषण छेडण्यात येणार आहे .
लांजा नगरपंचायतीच्या वतीने प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आल्यानंतर सुरुवातीपासूनच लांजा कुवे येथे नागरिकांनी या प्रारूप विकास आराखडा( डीपी)ला कडाडून विरोध केला होता .त्यानंतर हा विकास आराखडा रद्द किंवा त्याला स्थगिती मिळावी या दृष्टीने सातत्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू होता. खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत त्यानंतर राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना देखील लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने निवेदन सादर करून लांजा शहराच्या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी किंवा तो रद्द करण्यात यावा अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली होती .
लांजा नगरपंचायतीच्या वतीने विकास आराखडा तयार करण्यासाठी ज्या टंडन कंपनीला नेमण्यात आले होते त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण न करता लोकांशी, नागरिकांशी चर्चा न करता केवळ कार्यालयात बसून हा विकास आराखडा तयार केल्याचा आरोप लांजा कुवे बचाव समितीने केला आहे. लांजा कुवे या दोन्ही गावातील नागरिकांचे हेच म्हणणे आहे.या चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामुळे नागरिकांच्या भविष्यात जागा, जमिनी, घरे , गोठे यांच्यासह मालमत्तेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
अशाप्रकारे लोकांच्या घरादारानवर नांगर फिरवणारा हा विकास आराखडा आपल्याला नको आहे, अशी आग्रही आणि ठोस भूमिका लांजा कुवे नागरिकांसह लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेली आहे. नागरिकांचा कडाडून विरोध असताना देखील नगरपंचायतीकडे आलेल्या पंधराशे हरकतींवर सोमवार दिनांक ४ ऑगस्ट पासून सुनावणी घेण्यात येत आहे .
शासनाने नियुक्त केलेल्या समितीने ४ ऑगस्ट पासून सुनावणी सुरू केली आहे .परंतु नागरिकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ देखील दिला जात नाही. १५०० हरकती असतानाही अवघ्या चार दिवसात घाई गडबडीत ही सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील लांजा कुवे बचाव समितीने केला आहे .यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे लांजा कुवे बचाव समितीचे म्हणणे आहे.
आणि म्हणूनच टंडन कंपनी नेमकी वस्तूस्थितीची पाहणी न करता गुगल मॅप किंवा कागदपत्राच्या आधारावर कार्यालयात बसून विकास आराखडा तयार केला असल्याने या विकास आराखड्याला तातडीने स्थगिती मिळावी . व नव्याने विकास आराखडा तयार करावा अशी मागणी केली आहे. तसेच या आराखड्याच्या विरोधात दिनांक १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण छेडण्याचे जाहीर केले आहे .
याबाबतचे निवेदन आज लांजा तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी राजापूर, लांजा पोलीस निरीक्षक यांना देखील सादर करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना बचाव समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर, दिलीप मुजावर, बापू जाधव, मंगेश आबेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व लांजा -कुवे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते












