बाजारपेठ मार्गांवरील अनेक रस्ते पाण्याखाली
माजी सैनिक शासकीय विश्रामगृहावर झाड कोसळून नुकसान
मालवण | प्रतिनिधी : मुसळधार पावसाने मालवणाला बुधवारी अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे मालवण शहर जलमय झाले. बाजारपेठ, बांगीवाडा, बस स्थानक मार्गांवरील रस्ते पाण्याखाली गेले. अनेक घराना पाण्याने वेढा दिला. दुपारनंतर पावसाने उसंत घेतली.
मालवण बस स्थानक समोरील परिसर, भंडारी हायस्कुल मार्ग ते बाजारपेठ, बांगीवाडा परिसर पाण्याखाली गेला होता. पाण्यातून मार्ग काढतांना वाहनचालक, पादचाऱ्यांना कसरत करावी लागत होती.
कोसळलेल्या मुसळधार पावसात मालवण बांगीवाडा येथील माजी सैनिक शासकीय विश्रामगृहावर बाजूच्या जागेतील भलेमोठे चिंचेचे झाड कोसळल्याची घटना घडली. यावेळी विश्रामगृहात कार्यरत असणारे कर्मचारी थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत विश्रामगृहाच्या इमारतीचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
छप्पराचे व दोन खोल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावेळी विश्रामगृहातील एका खोलीत कार्यरत असलेले विश्रामगृह अधीक्षक अमर रेवंडकर, कर्मचारी गिरीश वराडकर, गोविंद गोसावी यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही व ते सुखरूप खोलीच्या बाहेर आले.
याबाबत माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे यांच्या सूचनेनुसार शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मंडळ अधिकारी पीटर लोबो व श्री. दळवी, पोलीस कर्मचारी सुशांत पवार यांनी पाहणी करत पंचनामा केला. या दुर्घटनेत विश्रामगृहाचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.
यावेळी सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, क्लार्क प्रसाद राणे, संघटक श्री. दळवी, कनिष्ठ सहाय्यक श्री. नाठलेकर यांनी विश्रामगृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच मालवण नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार, स्वच्छता मुकादम आनंद वळंजू व सफाई कर्मचारी यांनीही पाहणी केली.












