वेंगुर्ला बंदर येथे सागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ला येथे आज शुक्रवारी सायंकाळी सागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले बंदर याबरोबरच नवाबाग, मुठ, मोचेमाड, शिरोडा केरवाडा, म्हापण, निवती आदी समुद्र किनाऱ्यावर त्या त्या भागातील मच्छीमार बांधव आणि नागरिकांनी सागराला नारळ अर्पण करून सागराची पूजा केली. वेंगुर्ले शहरातील नागरिकांबरोबरच शासकीय मानाचा नारळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आणि तहसीलदार ओंकार ओतारी यांनी विधिवत पूजा करून सागराला नारळ अर्पण केला. त्यांच्या नंतर पत्रकार समिती, विविध संस्था, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वेंगुर्ला बंदर नारळी पौणिमा सण साजरा करण्यात आला. बंदर परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी या खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. किरकोळ स्वरूपात पावसानेही या सणाला हजेरी लावली.