खेड प्रतिनिधी – खेड तालुक्यातील खेड-खोपी मार्गावरील काणेकरवाडी येथे एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारी महिला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी सकाळी 12 वा सुमारास घडला.
याबाबत अधिक अशी की, खेडहून कुळवंडीच्या दिशेने जाणाऱ्या महिला दुचाकीस्वाराला खेड खोपी मार्गावरील हेदली काणेकरवाडी येथे समोरून येणाऱ्या चोरवणे खेड पुणे एस टी बसने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुचाकीवरील महिलेला देखील गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच खेड पोलिसांसह एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.











