गौरव पोंक्षे l माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल,माखजन येथे संस्कृत दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महादेव परब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व संस्कृत शिक्षक सदाशिव बापट होते.तर व्यासपीठावर पर्यवेक्षक अंबादास घाडगे,ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे सदाशिव बापट यांनी संस्कृत या प्राचीन भाषेचं महत्व सांगितले.संस्कृत भाषेच्या उगमापासून ते व्याप्ती पर्यंत सखोल मार्गदर्शन केले.आयुर्वेदातील बहुतांश माहिती संस्कृत भाषेत असून,आयुर्वेदाचा मूळ प्रचार व प्रसार हा संस्कृत भाषेमुळे सुलभ झाल्याचे नमूद केले.संस्कृत भाषेमुळे आपल्या भारताला एक वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रशालेत १०० मार्क साठी संस्कृत विषय घेता येतो हे अतिशय महत्वाचे आहे.या संधीचे प्रत्येकाने सोने करा.असे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतून भाषणे केली.संस्कृत भाषेतून देशभक्तीपर गीते पेश केली.यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तबला,ढोलकी व पेटीची साथ दिली.
अमली पदार्थ दिनानिमित्त प्रशालेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.दरम्यान संस्कृत दिनी मुख्याध्यापक महादेव परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संस्कृत दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत शिक्षक जगदीश जाधव यांनी केले.कार्यक्रम संपन्न होण्यासाठी जगदीश जाधव यांनी मेहनत घेतली.












