उपोषणकर्त्या नागरिकांशी पालकमंत्री नितेश राणे यांचा संवाद ठरला निर्णायक!

उपोषणकर्त्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांवर केली निश्चित.

सिंधुनगरी : प्रतिनिधी

उद्याच्या स्वातंत्र्यदिना दिवशी जवळपास १११ उपोषणकर्त्यानी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन अर्ज सादर केले होते व उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. तत्पूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पालकमंत्री नितेश राणे यांचा उपोषण करणाऱ्या नागरिकांशी झालेला संवाद महत्वपूर्ण ठरला! काही प्रश्न व्यक्तिगत स्वरूपाचे व काही प्रश्न सार्वजनिक स्वरूपाचे असले तरी ते सोडविण्याबाबत समाधानकारक संवाद झाला.

सिंधुनगरी येथील नवीन जिल्हा नियोजन समितीचे सभागृह नागरिकांच्या गर्दीने भरून गेले होते. महसूलच्या २८ जिल्हा परिषदेच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अशा मिळून १११ तक्रारींचे अर्ज दाखल झाले होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आदेश दिले. काही प्रकरणात तर पुन्हा हे प्रकरण माझ्यासमोर येता नये अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली. काही प्रश्न तांत्रिक तर काही प्रश्न न्यायिक स्वरूपाचे होते. त्या त्या स्तरावर त्याची सुनावणी घेऊन हे प्रश्न निकाली काढावेत अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागाच्या सर्वात जास्त म्हणजे 33 तक्रार अर्ज होते. पोलीस विभागाच्या 12, नगर विकास विभागाच्या 5, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग 24, जिल्हा परिषद बांधकाम विभाग 7, जिल्हा परिषद शिक्षण विभाग 7, आरोग्य विभाग 1, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास 3, लघु पाटबंधारे विभाग 6, भूमी अभिलेख 1, सार्वजनिक बांधकाम विभाग 5, राज्य उत्पादन शुल्क विभाग 1, प्रादेशिक बंदर अधिकारी 1, विभाग नियंत्रक 2, अधीक्षक डाकघर 1, जिल्हा शल्यचिकित्सक 2, वीज वितरण कंपनी 5, उपनिबंधक सहकारी संस्था 2 अशा एकूण 111 नागरिकांच्या तक्रारी होत्या. या सर्व प्रकरणात पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणत त्यांचे प्रश्न सोडविण्याचे या संवाद बैठकीत आदेश दिले.