रत्नागिरी: गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढा आणि क्रांतिकारकांविषयी माहिती देणाऱ्या ऐतिहासिक ग्रंथांचा समावेश होता.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. सुनील गोसावी यांच्यासह समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे आणि ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले, ज्यात त्यांनी प्रदर्शनाचा उद्देश आणि पुस्तकांची माहिती दिली.
या प्रदर्शनात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि राजकीय घडामोडींविषयी माहिती देणारी पुस्तके मांडण्यात आली होती. हे प्रदर्शन दोन दिवस सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. महाविद्यालयीन अध्यापक, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमाच्या शेवटी वाचक गटाचा विद्यार्थी कु. ओंकार आठवले याने आभारप्रदर्शन केले.











