तळागाळात काम करणाऱ्या संजू परबला निश्चितच उज्ज्वल भविष्य: आ. निलेश राणे

वाढदिवसानिमित्त संजू परब यांचे केले अभिष्टचिंतन

संजू भावासारखा : मी सदैव पाठिशी 

सावंतवाडी | प्रतिनिधी : संजू परब यांनी नगराध्यक्षपदाच्या काळात आपली क्षमता सिद्ध केली असून, भविष्यात ते या मतदारसंघातही ती दाखवून देतील. ग्रामीण भागाची जाण असलेला संजू परबसार खा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता विधिमंडळात असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला आमदारकीची इच्छा नसेल तरी एक दिवस तुम्ही आमदार होणारच, ही शिवसेनेची आणि आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे, तुम्हाला निश्चितच उज्वल भवितव्य आहे, अशा शब्दांत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मॅंगो हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. निलेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा देत वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. यावेळी आ. दीपक केसरकर, शिवसेना उपनेते सचिन आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, संजय पडते, महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा ॲड. निता कविटकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, तालुका प्रमुख बबन राणे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, उप जिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडीस यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, संजू परब यांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी मी कधीही वेगळ्या आमंत्रणाची वाट पाहत नाही, कारण तो माझ्या घरचाच माणूस आणि माझा भाऊच आहे. त्याच्या व माझ्यातील ऋणानुबंध वेगळेच आहेत. माझ्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात तो माझ्या सोबत ठाम राहिला आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात त्याने मला कायम साथ दिली आहे. त्यामुळे कधी कधी काही राजकीय खेळी होत असल्या तरीही संजू मला सोडून कधीही दूर जाऊ शकत नाही, अशा शब्दांत संजू परब यांच्या कामाची तळमळ, निष्ठा आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे त्यांनी कौतुक केले.

ते म्हणाले, मी गेल्या १६ वर्षांपासून दरवर्षी संजू परब यांच्या वाढदिवसासाठी सावंतवाडीत येतो. राजकारणामध्ये चढ-उतार असूनही, पराभवांना तोंड देऊनही, संजू परब माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्यासारखी प्रामाणिक, निस्वार्थ माणसे माझ्यासोबत का राहिली, हे आजही मला कळले नाही. त्यांच्याकडे अनेक गुण आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वानेच त्यांना भविष्यात अनेक पदे मिळतील, याची मला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजू परब यांच्याकडे नेतृत्व करण्याची कला आहे, आणि ती योग्यरित्या वापरली गेली पाहिजे. त्यांचे योग्य नियोजन तळगाळात पोहोचावे यात संजूचा हात कोणी धरू शकत नाही. त्याला नेहमीच आमची साथ आहे व राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

*माझ्यासाठी संजू परब म्हणजे भाऊच*: *आ. निलेश राणे*

राजकारणात संजू परब म्हणजे माझा माणूस. मला विचारल्याशिवाय तो कोणताही मोठा निर्णय घेत नाही. त्याला कितीही ऑफर्स आल्या तरी तो सर्वात आधी मला फोन करतो. आमच्या दोघांचे जीवाभावाचे नाते आहे. तो माझा भाऊच आहे. राजकारणात निलेश राणेंचे नाव कधीही खाली पडू नये यासाठी संजू परबने स्वतः बदनाम होणे स्वीकारले, पण निलेश राणेंची बदनामी कधी होऊ दिली नाही, असे सांगत श्री. राणे यांनी संजू परब यांच्या निष्ठेची प्रशंसा केली.