तालुक्यातील कादवण येथे घर कोसळून नुकसान, तर गोठे व नारायणनगर येथे अंशतः घरांचे नुकसान
तालुक्यात आतापर्यंत सरासरी 2857 मिमी. पावसाची नोंद
मंडणगड : प्रतिनिधी, – तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी ( 19 ) काहीसा कमी झाला असला तरी पावसाची संततधार कायम होती. सोमवारी दिवसभरात तालुक्यात सरासरी 147 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारच्या पावसामुळे तालुक्यातील घरांचे 1 लाख 70 हजारांचे नुकसान झाले.
कादवण येथील चंद्रा जाधव यांच्या घराचे पूर्णतः घर कोसळले. यामध्ये त्यांचे 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोठे येथील विनेश जाधव यांच्या घराचे अंशतः 24 हजार रुपयांचे तर नारायणनगर येथील विजया भोगल यांचे घराचे अंशतः नुकसान झाले असून 16 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
सतत तीन चार दिवस तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे नुकतेच दापोली फाटा ते पालवणी फाटा या या मार्गावरील बुजवण्यात आलेले रस्त्यातील खड्डे पूर्वपदावर आल्याने नागरिकांमध्ये चर्चेचे कारण ठरले. तर दोन दिवस शहरात विजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.










