रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी): कोकणात हवामान विभागाने सोमवार पासुनच अलर्ट जारी केलेला आहे. हवामानाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून गेल्या 48 तासांमध्ये कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तरेकडील दापोली, खेड व मंडणगड तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या तिन्ही तालुक्यांमधील बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी घरात आणि दुकानात जाऊन मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कोकण किंनारपट्टीवर वाहणारे वेगवान वारे याचा फटका मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणात बसला असून त्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासात दापोली तालुक्यात 210 मिमी पावसाची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात नोंद झाली आहे. आज सकाळी 8 वाजलेपासुन पासून दुपारी 3 वाजेपर्यंत 20 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत 3268 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी चिपळूण तालुक्यासह खेड येथील पुरस्थितीची पाहणी केली आहे.
*दापोलीत पावसामुळे सुमारे सात लाखाचे नुकसान*
दरम्यान दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामध्ये दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पडझड झाले असून काही मालमत्त्यांचे नुकसान झालेले आहे. दापोली तालुक्यातील जालगांव येथील ज्ञानेश्वर लिंगावळे यांच्या घरात पाणी शिरून सुमारे 7000 रुपयांचे नुकसान झाले आहे.
मोजे नारगोली येथील मनोहर शिगवण यांच्या बागेतील सुमारे सुपारीचे 80 झाडे जमीनदोस्त झाली आहेत. मौजे पाजपंढरी येथील वामन बबन रघुवीर यांच्या घराचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पांडुरंग भाया चौगुले यांच्या घराचे 45 हजाराचे नुकसान, नरेश भाया चौगुले 45 हजाराचे नुकसान, रामदास गोपाळ पावशे 40 हजाराचे नुकसान, रामदास कमळ्या खळे 40 हजाराचा नुकसान, पांगारी तर्फे हवेली येथील अशोक लक्ष्मण मेढेकर यांचे 2650 चे नुकसान दापोली उदयनगर येथील जयश्री शांताराम माने यांच्या घराचे 25 हजाराचे नुकसान, मौजे कँम दापोली येथील मास्टर पॅराडाईज पिकप शेडचे संरक्षण भिंत कोसळून 1 लाखाचे नुकसान, लोणवाडी येथील संजय रहाटवळ, मोहन रहाटवळ, प्रभाकर रहाटवळ यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर करंजाणी येथील पांडुरंग बालगुडे यांच्या जनावरांचा गोठा पावसामुळे कोसळला असून जनावरांची जीवित हानी झालेली नाही. मात्र या दोघांच्या घराचे आणि गोठ्याचे नुकसान किती झाले याचा पंचनामा उशिरापर्यंत चालू होता.
*एस.टी. महामंडळाच्या अनेक गाड्या बंद*
दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने दापोली तालुक्यातील एसटी महामंडळाला देखील मोठा फटका बसला आहे. आज मुंबईमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे तसेच रिझर्वेशन आणि कमी भारमन असल्यामुळे मुंबई जाणाऱ्या अनेक गाड्या बंद करण्यात आले आहेत. कालपासून खेड येथे जगबुडी नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीचे पाणी हे दापोली खेड महामार्गावर आल्याने कालपासून दापोली खेड महामार्ग बंद आहेत. आज रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी रेल ऑर्डर मिळेल सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिल्यामुळे अनेक शाळेच्या फेऱ्या आज बंद होत्या. तसेच चिपळूण येथे पुराचे पाणी आल्याने दापोलीहून निघणाऱ्या गणपतीपुळे रत्नागिरी गाड्या या रद्द करण्यात आल्याची माहिती दापोली डेपोच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या कोल्हापूर, मिरज गाड्या न आल्याने दापोलीतून कोल्हापूर मिरज कडे जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत.
दि 18/08/2025 पावसाची आकडेवारी
दापोली 188 mm
बुरोडी 173 mm.
दाभोळ 127 mm
आंजर्ले 138 mm
वाकवली 165 mm
पालगड 147 mm
वेळवी 140 mm
एकूण=1078 mm
दि 19/08/2025 पावसाची आकडेवारी
दापोली 230 mm
बुरोडी 174 mm.
दाभोळ 163 mm
आंजर्ले 184 mm
वाकवली 194 mm
पालगड 156 mm
वेळवी 172 mm
एकूण=1273 mm
आजचा सरासरी पाऊस=181.85 mm









