अर्जुना नदी ईशारा पातळीच्या वरच , प्रशासनाकडून सतर्कतेच्या सुचना
राजापूर | प्रतिनिधी : गेले दोन ते तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसात राजापूर तालुक्यात चार घरे व एका गोठयाचे नुकसान झाले आहे. कुवेशी येथील संतोष वासुदेव कांबळी यांचे घरावर आंबाडीचे झाड पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले आहे. तर तुळसुंदे वाडी (होळी) सुधाकर बाळकृष्ण हरचकर यांचे घरावर आंब्याचे झाड पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले आहे. राजापुरात मंगळवारी १११. ६२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
राजापूर शहर आणि तालुक्यात गेले दोन ते दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. राजापूरातील पूर ओसरला असला तरी अर्जुना नदी बुधवारी सायंकाळीही ईशारा पातळीच्या वरच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात या पावसाने तडाखा दिला असून तालुक्यात चार घरे व एका गोठयाचे नुकसान झाले आहे. याबाबत तहसीलरदार विकास गंबरे यांनी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.










