वेंगुर्ला तालुक्यातील हरिचरणगिरी गावात महिला बनवताय गणेशमूर्ती

वेंगुर्ला : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणातील गणेश शाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग पाहायला मिळत आहेत. कोकणातील बहुतांश भागामध्ये पुरुष वर्गाकडून गणेशमूर्ती घडवली जाते. परंतु, वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी गावातील महिला गणेशमूर्ती बनवितात.

हरिचरणगिरी गावातील हेमंत मठकर हे मागील चार पिढ्यांपासून गणेशमूर्ती बनवित आहेत. या शाळेमध्ये गावठी माती, शाडू माती, लगद्यापासून तसेच गायीच्या शेणापासून गणपतीच्या मूर्ती बनविल्या जातात. दरम्यानच्या काळात हेमंत मठकर हे कर्नाटक राज्यातील गोकाक येथे गेले होते. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी महिला गणेशमूर्ती बनवताना दिसल्या. मठकर यांनी आपल्या गावातील महिलांना गणेशमूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिले आणि आता या महिला गणेशमूर्ती बनविणे, शेडिंग, रंगकाम करीत असून मठकर हे त्यांना त्यांच्या कामाचे मानधनही देतात. अशारितीने कोकणात आता महिलांनी गणेश शाळांमध्ये आपली कला दाखवित आहेत.