कुत्र्याचा पाठलाग करणे पडले महाग
वनविभागाने केली सुटका
निलेश जाधव / देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीखुर्द येथे कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या बाथरूममध्ये अडकल्याची घटना सोमवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात घेतले. यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली.
याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारखुर्द गावणवाडी येथील ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये सोमवारी पहाटे ४.३० वा. कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट हा वन्यप्राणी अडकला असल्याची बातमी पोलीस पाटील कुंभारखणीखुर्द यांनी वनविभागास दिली. मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता बाथरूममध्ये कुत्रा व बिबट्या अडकला असल्याचे आढळून आले. सदरवेळी वनविभागाने बाथरूमचा दरवाजा वरील बाजूस लाकडी फळ्यांनी बंद करून पिंजरा लावला व बिबट्यास सुरक्षितरित्या पिंजऱ्यामध्ये घेतले त्यानंतर कुत्रापण सुरक्षित बाथरुममधून बाहेर आला.
सदर वन्य प्राणी बिबट याची पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ कडवई श्री सूर्यकांत बेलुरे यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून घेतली. बिबट नर असून वय आठ ते नऊ वर्ष आहे, सदर वन्य प्राणी बिबट तंदुरुस्त असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सदर वेळी घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी, संगमेश्वर देवरुख, श्री. न्हानू गावडे, वनरक्षक फुणगूस श्री आकाश कडूकर वनरक्षक साखरपा श्री. सहयोग कराडे, वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली श्री सुरज तेली वनरक्षक जाकादेवी श्रीमती शर्वरी कदम पोलीस पाटील कुंभारखणीखुर्द श्री रविंद्र महाडिक व ग्रामस्थ हे उपस्थित होते. सदरची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421 741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाचे वतीने विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.












