रत्नागिरी :
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शेतकरी बांधवांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या बैठकीत त्यांनी विशेषतः अॅग्रीस्टॅक (AGRISTACK) योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी करून फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले. शासन निर्णयानुसार दि. 11 एप्रिल 2025 पासून पीक विमा, फळपीक विमा, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसानभरपाई, पीएम किसान योजना अशा विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाने पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठीही अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी बंधनकारक केली आहे.
नोंदणी प्रक्रिया :
शेतकऱ्यांना स्वतः mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. तसेच सीएससी केंद्रे, कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर नोंदणी सुरु आहे.
जिल्हाधिकारी यांनी गणेशोत्सवाकरिता गावी येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित नोंदणी पूर्ण करून तातडीने फार्मर आयडी काढावा, असे आवाहन केले.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पीककर्ज सुलभ, पारदर्शक आणि कागदविरहित पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी जनसमर्थ KCC पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचे अॅग्रीस्टॅक डेटाशी एकत्रिकरण करण्यात आले असून, पात्र शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज मंजुरी मिळणार आहे.
पात्रतेसाठी अटी:
-
आधार क्रमांक सक्रिय मोबाईल क्रमांकाशी संलग्न असावा.
-
अधिसूचित सहभागी बँकेत खाते असणे आवश्यक.
-
शेतकरी अॅग्रीस्टॅक रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत असावा व मंजुरी मिळालेली असावी.
-
सद्यस्थितीत ही सुविधा फक्त वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा किंवा सीएससी धारकांच्या माध्यमातून जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.











