ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे व आ. दीपक केसरकर यांचें वेधले लक्ष
आंबोली । प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात
आंबोली गुरववाडी येथील गणेश विसर्जन मार्गावर कुंपण घालून तो बंद केल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे संतप्त झालेल्या मुळवंतवाडी – गुरुववाडी येथील नागरिकांनी याविरोधात आवाज उठवत, रस्ता मोकळा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात अनेक वर्षांपासून वापरला जाणारा सार्वजनिक रस्ता कुंपण घालून बंद केल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. गणेश विसर्जनाच्या काळात होणारी अडचण आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन, हा रस्ता तातडीने पूर्ववत खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे आंबोली ग्रामपंचायतच्या २३ नंबर ला रस्ता नोंद झाली आहे. मात्र, या रस्त्यावर कुंपण घालून रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
याकडे पालकमंत्री नितेश राणे तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी लक्ष देऊन प्रशासनाला सूचना करीत सदर रस्ता मोकळा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.












