वैभववाडी | प्रतिनिधी
सांगुळवाडी येथील बी. फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विराट उदयसिंह गायकवाड (वय २२, रा. आळवे कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या विद्यार्थ्याचा रविवारी सायंकाळी आकस्मिक मृत्यू झाला. सायंकाळी सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराट गायकवाड हा सांगुळवाडी येथील बी. फार्मसी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत चायनीज खाऊन तो आपल्या भाड्याच्या खोलीवर परतला. त्यानंतर अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याचा रूम पार्टनर केतन किरण माने याने इतर मित्रांच्या मदतीने त्याला प्रथम वैभववाडीतील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
विराट व त्याचे काही मित्र वैभववाडी बाजारपेठेत भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेत होते. त्याच्या अकाली निधनाने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाविद्यालयीन परिसरातही शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून वैभववाडी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.












