मळगाव येथील माळीच्या घरच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन भव्य मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी

 सावंतवाडी । प्रतिनिधी :
 सातशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील माळीच्या घरातील म्हणजेच घरवडकर राऊळ कुटुंबियांच्या गणपतीचे आज सातव्या दिवशी उत्साहात व जल्लोषात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी या भव्य गणेशमूर्तीची फटाक्यांची आतषबाजी व वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या विसर्जन सोहळ्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.

सुमारे सातशे वर्षाहूनही अधिक काळ गणेशोत्सवाची परंपरा व ८५ पेक्षाही अधिक कुटुंबांच्या सामूहिकतेतून जपली जात असलेली परंपरा असलेला मळगांव येथील माळीच्या घरचा गणपती सुप्रसिद्ध आहे. या परंपरे अंतर्गत यावर्षी ही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. मळगांव गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या व मळगांवसह सावंतवाडी तालुक्याचे धार्मिक भूषण असलेल्या या गणरायाचे सालाबादप्रमाणे सातव्या दिवशी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत विसर्जन पार पडले.
हा गणेशोत्सव राऊळ कुटुंबियांच्या सामूहिक व कौटुंबिक एकतेचे
आदर्श उदाहरण असून दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवात गणपती पुजन, ऋषिपंचमी, गौरी पुजन व विसर्जन, सत्यनारायण महापूजा, भजने, फुगडी सहीत लहान व तरुण मुले-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

माळीच्या घरातील गणेशोत्सव हा पारंपरिक सात दिवसांचा असतो. मुख्य म्हणजे या घरामध्ये सर्वजण एकत्र येऊन रोज काकड आरती, दुपारची आरती व सायंआरती करुन गणराया ची आराधना करतात. तर पहिल्या दिवशी म्हणजेच मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेशाचे विधिवत पूजन झाल्यावर गणेशाला ह्या कुटुंबियांकडून वेगवेगळ्या सात प्रकारचा नैवेद्य दाखविला जातो आणि यातूनच सामुहीक भोजनाचा आनंदही लुटला जातो. शिवाय या घरातील प्रत्येक कुटुंबियांकडून गणेशाला आपल्या आवडीचाही नेवैद्य दाखविला जातो. उत्सवाच्या सात दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतल्या जातात. घरातील सर्व कुटुंबातील महिला एकत्र येत रोज गणपतीसमोर विविध प्रकारच्या फुगड्या घालतात याशिवाय रोज सायंकाळी आरतीनंतर भजन व शेवटच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे सातही दिवस संपूर्ण घरात भक्तीमय वातावरण पसरलेले असते. सातही दिवस या घरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांत ज्येष्ठ, तरुण मंडळींसह घरातील लहान मुलेही आनंदाने सहभागी होत असतात. सातव्या दिवशी चोवीस जणांच्या आधाराने श्रींचे भक्तीमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात विसर्जन केल्यानंतर सामुहिक भोजन घेऊन हे बांधव पुढच्या भेटीचे नियोजन करून आपापल्या कामासाठी मार्गस्थ होतात. सात दिवस आपल्या लाडक्या देवाची सेवा केल्यानंतर निरोपाच्या वेळी सद्गदित भावनेने पुन्हा पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची आस उराशी बाळगूनच गावातील वेस ओलांडतात. यावर्षीही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या उत्सवाला नातेवाईक मळगांव ग्रामस्थ, राजकीय व्यक्ती, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक, उद्योजक, व्यवसायिक, कलावंत आदींसहीत भाविकांनी या गणपतीचे दर्शन घेतले. तर माळीचेघर मधील अनेक कुटुंबियांनी गणपती ला गाऱ्हाणे घालून सुख समृद्धी, आरोग्य व नोकरी व्यवसायात भरभराट होण्यासाठी साकडे घातले. त्यानंतर भव्य मिरवणुकीने या गणरायाचे थाटात विसर्जन करण्यात आले.