सव्वानऊ वाजताची सोनुर्ली बस वेळेत सोडा, भाजपची मागणी 

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्याची विनंती

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी एसटी आगारातून दररोज सकाळी ९:१५ वाजता सोनुर्लीसाठी सुटणारी बस अनियमित असल्यामुळे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बस वेळेवर सोडून सर्वांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक निलेश गावित यांना निवेदन देऊन केली आहे.

सोनुर्ली गावासाठी सकाळी ९:१५ वाजता सुटणारी ही बस १० वाजता गावात पोहोचते. सावंतवाडी शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बस खूप महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून ही बस वेळेवर पोहोचत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाइलाजाने शाळा-कॉलेज चुकवावे लागत आहे. त्याचबरोबर, बाजारहाटासाठी शहरात जाणाऱ्या गावकऱ्यांनाही आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.

या गंभीर समस्येबाबत सोनुर्लीचे उपसरपंच भरत गावकर यांनी यापूर्वीही भाजपच्या माध्यमातून आगार व्यवस्थापक श्री. गावित यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी, वेळोवेळी केवळ आश्वासने देण्यात आली. लक्ष वेधल्यानंतर एक-दोन दिवस बस वेळेवर धावते आणि पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच राहते, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ही समस्या सोडवण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महेश धुरी आणि सचिन बिर्जे यांनी श्री. गावित यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. ही बस गावातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, बससाठी तब्बल पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हवेली येथे जावे लागते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे ही बस यापुढे वेळेवर सोडण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर आगार व्यवस्थापक निलेश गावित यांनी सदर बस वेळेत सोडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.