खेड (प्रतिनिधी) : आज दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी लायन्स क्लबचे सदस्य आदित्य विजय चिखले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत “निराधारांना आधार” या उपक्रमांतर्गत शिव खुर्द विकास वाडी येथे आकस्मित निधन पावलेले अनंत इप्ते यांच्या कुटुंबाला तात्काळ स्वरूपात मदत म्हणून जिन्नस भेट देण्यात आली.
अनंत इप्ते यांच्या पच्छात त्यांच्या पत्नी आरती अनंत इप्ते व चार लहान मुली आहेत. कुटुंबाच्या या कठीण प्रसंगात लायन्स क्लबने मदतीचा हात देत एक आधार दिला. तसेच या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन युवासेना जिल्हासचिव राकेश सागवेकर यांनी त्या शिकत असलेल्या संस्थेकडे संपर्क साधून त्यांच्या फी माफीची तात्काळ विनंती केली.
या उपक्रमादरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी लायन्स क्लबच्या सामाजिक जाणिवेचे विशेष कौतुक केले. “आपण केवळ मदत करता एवढेच नव्हे तर ती मदत योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचली आहे का, याची खात्रीसुद्धा करून घेता. त्यामुळे आपल्या उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढते,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, खजिनदार माणिक लोहार, लायन आदित्य चिखले, युवासेना जिल्हासचिव राकेश सागवेकर, प्रकाश कुळे सर तसेच मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. लायन्स क्लबने केलेली ही मदत इप्ते कुटुंबासाठी दिलासा ठरली असून, समाजातील इतर घटकांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.












