कुडली विद्यालयाच्या विद्यार्थिनींची तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत बाजी

चिपळूण (प्रतिनिधी) : नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ, कासेगाव, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर संचालित माध्यमिक विद्यालय कुडली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी या ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थिनींनी ११ सप्टेंबर रोजी देवघर (ता. गुहागर) येथे आयोजित शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे व परिसराचे नाव उज्वल केले आहे.
स्पर्धेत विजयी ठरलेल्या संघातील विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे- आरुषी घेवडे, श्रीषा पावरी, संस्कृति बारस्कर, आर्या बारस्कर, पौर्णिमा दावडे, तनुजा दावडे, आस्था पावरी, आदिती जाधव, श्रुती गिजे व आर्या पावरी व इतर खेळाडू. या संघाचे प्रशिक्षक मुख्याध्यापक बाबुराव खाडे व व्यवस्थापक केशव आग्रे तसेच श्री. गजभार व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच वि‌द्यार्थिनींनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाचे श्रेय संस्था संचालक दिलीप राव चौघुले यांच्या प्रोत्साहनाला दिले जाते. त्यांनी शाळेला सतत मदत व प्रेरणा दिली आहे. तसेच जनता शिक्षण संस्था कुडली ता. गुहागर या संस्थेचे अध्यक्ष वसंत महादेव किल्लेकर यांचेही वेळोवळी मोलाचे प्रोत्साहनही लाभलेले आहे. या यशामुळे कुडली, सडे जांभरी, काताले व परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, शालेय सर्व समित्या, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.