सावंतवाडी : गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना आज सकाळी सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ₹३,५६,००० किमतीची ५४ बॉक्स दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली ₹८,००,००० किमतीची बलेनो कार (MH07/AG/9737) असा एकूण ₹११,५६,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बसत्याव घोन्सालवीस उर्फ बंटी (रा. होडावडा, ता. वेंगुर्ला) आणि आजू उर्फ तुकाराम नाईक (रा. किनळे, ता. सावंतवाडी) हे आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास किनळे माऊली मंदिर स्टॉपजवळ मुख्य रस्त्यावर एका बलेनो गाडीतून ही दारू घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या पथकाने केली. या पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक (Asi) राठोड, हवालदार डिसोझा, तवटे, आशिष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल समजिस्कर यांचा समावेश होता.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक (Asi) महेश अरवारी करत आहेत.













