आंब्याचे झाड घरावर कोसळले; घरमालक जखमी

लांजा तालुक्यातील आगवे मोरेवाडी येथे गुरुवारी मध्यरात्रीची घटना
 या दुर्घटनेत घराचे सुमारे दोन लाख रुपयांचे झाले नुकसान

 लांजा | प्रतिनिधी : प्रचंड कडकडाट करत रात्रीच्या सुमारास आंब्याचे झाड घरावर कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना लांजा तालुक्यातील आगवे मोरेवाडी येथे गुरुवारी २९ जून रोजी रात्री १ वाजता घडली असून या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे.

तालुक्यातील आगवे गावातील मोरेवाडी येथील सुरेश घडशी यांच्या घरावर गुरुवारी २९ जून रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रचंड कडकडाट करीत पावसामुळे घराशेजारी असलेले आंब्याचे झाड घरावर कोसळले. यावेळी घरामध्ये घर मालक सुरेश घडशी (वय ४८) पत्नी समता सुरेश घडशी (वय ४५), मुलगी सोनल घडशी (वय १५), मुलगी सलोली घडली (वय १४) आणि मुलगा शुभम घडशी (वय १६) असे पाच जण झोपले होते. गुरुवारी मध्यरात्री प्रचंड कडकडाट करत आंब्याचे झाड हे त्यांच्या घरावर कोसळले. या घटनेत घराच्या छप्पर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरावरील वासे, छप्पर तसेच कौले, सिमेंट पत्रे मोडून पडले आहेत.

या दुर्घटनेत संपूर्ण घडशी कुटुंब बालमबाल बचावले आहे .मात्र सुरेश घडशी हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचा पंचनामा आगवे पोलीस पाटील तसेच तलाठी, ग्रामपंचायत सरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. यामध्ये घडशी यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.